doctors organisation altimet of maharashtra government
doctors organisation altimet of maharashtra government

'तब्बल 45 हजार डॉक्टर 14 दिवस होणार होम क्वारंटाईन?'

रत्नागिरी - गेले सहा महिने जीवाची पर्वा न करता एकही सुट्टी न घेता महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्स कोविड रुग्णांची सेवा करत आहेत. यात 150 हून अधिक डॉक्टर्स मृत्यूमुखी पडले. अनेक जण बाधित आहेत. राज्यातील नेत्यांनी व शासकीय अधिकार्‍यांनी जसे सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे, त्यानुसार सर्व डॉक्टर्स सामुदायिकरित्या सेल्फ क्वारंटाईन करून घेण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका घेत या विलगीकरणाची मुदत 14 दिवसांपर्यंत असेल, असा इशारा आयएमए संघटनेने दिला आहे. 
यासंदर्भात संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. निशा नाफडे, कोविड समन्वयक डॉ. निनाद नाफडे आदींनी प्रसिद्धीपत्र दिले आहे.

कोविड 19 उपचार करणार्‍या रुग्णालयांसाठी सरकारने सक्तीने लादलेल्या आणि न परवडणार्‍या दरात खासगी रुग्णालये चालवणे शक्य नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशाचा निषेध करून इंडियन मेडिकल असोसिएशनने आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
 निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या दरामध्ये ऑक्सिजन, पीपीई कीटस, बायोमेडिकल वेस्ट चार्जेस, पगार, निर्जंतुकीकरणाचा खर्च भागवणे अशक्य आहे. 31 ऑगस्टला शासनाने पत्र काढले पण विनंती करूनही संघटनेसोबत राज्य शासनाने चर्चा केलेली नाही. मध्यम आकाराची सुमारे अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 4 सप्टेंबरला राज्यस्तरीय प्रतिनिधी बैठकीत शासनाचे हे परिपत्रक फेटाळण्यात आले. रुग्णालयाचे दर ठरवण्याच्या अधिकारावर हे अतिक्रमण आहे. तसेच आयएमएने केलेल्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्याचा निषेध आयएमएमने केला. राज्यातील 216 शाखांमधील 45 हजार डॉक्टर 17 सप्टेंबरपासून आंदोलन करणार आहेत. 
आंदोलनाच्या आझाद मैदानावर महारॅली, आपापल्या हॉस्पीटलबाहेर शहीद डॉक्टरांच्या स्मरणार्थ 10 मिनीटे मूक श्रद्धांजली वाहण्यात येईल. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सकांना निवेदन देऊन सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात येणार आहे.

प्रशासकांमुळे महामारी नियंत्रणाबाहेर

महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या नियंत्रणाला अपयश येण्याचे कारण म्हणजे डॉक्टरांचा सल्ला न घेता साथीच्या नियंत्रणाची जबाबदारी पूर्णपणे प्रशासकांच्या हाती दिली हे आहे. त्यांच्याद्वारे अदूरदर्शी, अशास्त्रीय, मानवतेविरोधी, दडपशाही कार्यपद्धतीत आहे. साथ नियंत्रणासाठी खासगी रुग्णालयांचे योगदान अमूल्य आहे. मात्र अपयश लपवण्यासाठी खासगी डॉक्टरांवर चिखलफेक करणार्‍या सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात संघटनेचा लढा आहे, असे पत्रात म्हटले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com