Dodamarg Pattern Of Cloth Bags Sindhudurg Marathi News
Dodamarg Pattern Of Cloth Bags Sindhudurg Marathi News

काय आहे कापडी पिशव्यांचा "दोडामार्ग पॅटर्न' ? 

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या नव्या कापडी पिशव्यांच्या उपक्रमात दोडामार्ग तालुक्‍याचा "दोडामार्ग पॅटर्न' अव्वल ठरला आहे.  कापडी पिशव्यांमुळे रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिक निर्मूलन होणार आहे.

प्रशासनाच्या मागणीनुसार जिल्ह्यातील अनेक महिला समूहाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर पिशव्यांचे नमुने सादर केले होते. त्यात मणेरी येथील गोपीनाथ परिवर्तन स्वयंसाह्यता महिला समूहाने सादर केलेल्या नमुन्याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्यता दिली. आता हा कापडी पिशव्यांचा "दोडामार्ग पॅटर्न' संपूर्ण जिल्ह्यात राबवला जाणार आहे. दोडामार्ग हा जिल्ह्यातील टोकाचा, दुर्लक्षित आणि विकसनशील तालुका आहे; मात्र त्याच तालुक्‍याने आदर्शवत पॅटर्न तयार करून जिल्ह्याला आपली नवी ओळख दिली आहे. 

बचत गटांच्या माध्यमातून जिल्हाभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. उमेद अभियानांतर्गत रोजगाराच्या नवनवीन संधी महिला समूहांना उपलब्ध होत आहेत. शेतीत नवनवीन प्रयोग महिला करत आहेत. कुटिरोद्योग, लघुद्योग, प्रक्रिया उद्योग यातून त्या आत्मनिर्भर बनत आहेत. शासनही महिलांना प्रोत्साहन देत आहे. त्यातूनच महिला समूह आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना राबवून प्रशासन आणि शासनाच्या प्रतिनिधीसमोर शाश्‍वत रोजगारासंदर्भातील सादरीकरण करत आहेत. तालुका आणि जिल्हास्तरावर अशी सादरीकरणे करण्यात आली आहेत. असेच एक सादरीकरण होते ते कापडी पिशव्या बनवण्याचे. 

तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोर सादरीकरण झाले होते. जिल्हाभरातील महिला बचत समूहांना पाणी व स्वच्छता मिशन आणि महिला व बाल विकास प्रकल्पाच्यावतीने जास्तीत जास्त 70 रुपये खर्चात 18 बाय 14 इंचांची कापडी पिशवी बनविण्यास सांगितले होते. त्यावर "बेटी बचाओ, बेटी पढाओ' आणि पाणी व स्वच्छता मिशनचा लोगो आणि टॅग लाईन प्रिन्टची अटही होती.

त्यानुसार जिल्हाभरातून तशा कापडी पिशव्यांचे नमुने सादर करण्यात आले. त्यात दोडामार्ग तालुक्‍यातील मणेरीसह तळकट आणि खानयाळे येथील गटांचा समावेश होता. जिल्हास्तरावर जिह्यातील बारा व्यावसायिक समूहांचा त्यात सहभाग होता. त्यातील गोपीनाथ महिला समूहाने बनवलेली पिशवी सगळे निकष पूर्ण करणारी आणि आकर्षक असल्याने ती अव्वल ठरली. जिल्ह्यातील त्या नव्या उपक्रमात तालुक्‍याने पिशव्यांचा "दोडामार्ग पॅटर्न' सरस ठरवून ठसा उमटवला. आता त्या पॅटर्ननुसार जिल्ह्यातील अकरा महिला समूह दोन्ही विभागांना लागणाऱ्या कापडी पिशव्या तयार करून देणार आहेत. कापडी पिशव्यांमुळे रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिक निर्मूलन होणार आहे. 

गोपीनाथ समूहाच्यावतीने या आधी कागदी, कापडी आणि ज्यूटच्या पिशव्या बनवून तालुकास्तरावर प्रेझेंटेशन केले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर सादरीकरणाची संधी मिळाली. त्यांनी पिशवीची निवड सर्वोत्तम म्हणून केली. ती बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. 
- मनीषा नाईक, समुदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी). 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com