सिंधुदुर्गच्या डीवायएसपीपदी डॉ. रोहिणी सोळंके यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

तालुक्‍यात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध धंदे आणि महिलांवरील अत्याचारावर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सावंतवाडी : उपविभागीय पोलिस अधीक्षक म्हणून डॉ. रोहिणी सोळंके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्या आज हजर झाल्या. त्यांना अलीकडेच येथे नियुक्तीचे आदेश झाले होते. डॉ. सोळंके एमबीबीएस आहेत. 

पोलिस सेवेत येण्याची आकांक्षा धरून खडतर प्रशिक्षण प्रयत्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर नाशिक येथे पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये दोन वर्षे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून रुजू झाल्या. तेथे काही काळ सेवा पूर्ण करून त्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर उपविभागीय कार्यालयात त्यांनी उपविभागीय अधिकारी पदाची सूत्रे सांभाळली.

हेही वाचा - गुहागरमध्ये कोविड केअर सेंटरच्या आशा मावळल्या 

या तीन वर्षांच्या संपूर्ण प्रशिक्षण व सेवा काळानंतर आज त्यांनी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वीचे अधिकारी शिवाजी मुळीक यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे. गेले काही दिवस सावंतवाडी तालुक्‍यासह वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्‍यात गुन्हेगारी प्रवृत्ती बळावली आहे. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर येत आहेत. लॉकडाउनपूर्वी चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र सुरू होते. अवैध दारू, मटका, जुगार या धंद्यांनाही लॉकडाउनच्या काळात ऊत आला आहे. मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक आणि विक्री सुरू आहे. 

अत्याचारांना आळा शक्‍य

उपविभागीय पोलिस अधीक्षक सोळंके यांच्या नियुक्तीने सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्‍यात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध धंदे आणि महिलांवरील अत्याचारावर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा - तोतया तहसीलदाराने विधवेला फसवले १२ लाखाला

 

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. rohini solanke appoint as a new DYSP of a sawantwadi division in sindhudurg