पाणी समजून त्या चिमुकल्यांनी पिले डिझेल अन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drinking diesel two childrensin savantwadi kokan marathi news

डिझेल प्यायल्याने बहीण-भाऊ अत्यवस्थ..पिंगुळीतील घटना; अधिक उपचारांसाठी गोवा- बांबोळी येथे हलविले..

पाणी समजून त्या चिमुकल्यांनी पिले डिझेल अन...

सावंतवाडी (सिंधुदूर्ग)  :  रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांच्या दोन चिमुकल्यांनी पाणी समजून डिझेल पिल्याची घटना आज आज दुपारी चारच्या सुमारास घडली. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना अधिक उपचारांसाठी गोवा- बांबोळी येथे पाठविले आहे.
स्नेहल शिवानंद चव्हाण (वय साडेतीन वर्षे), विराट शिवानंद चव्हाण (दीड वर्ष) अशी त्या मुलांची नावे आहेत. 

कुडाळ-पिंगुळी येथे एका रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी काही कामगार व त्यांचे कुटुंबीय पिंगुळी येथे हंगामी कालावधीसाठी स्थायिक झाले आहेत. तेथे कामासाठी आलेल्या कामगारांना विजेची सोय नसल्याने त्यांना डिझेलवर पेटणाऱ्या दिव्यावरच अवलंबून रहावे लागते. यासाठी रात्री दिवा पेटविण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीमध्ये राहत असलेल्या जागेत डिझेल आणून ठेवले होते.


हेही वाचा - यंदा मुंबईकरांची उन्हाळी सुटी होणार स्पेशल...का ते वाचा..?

अनावधानाने पाणी समजून पिले डिझेल

आज सायंकाळच्या सुमारास आज ही छोटी भाऊ -बहीण खेळत होती. काही कालावधीनंतर त्यांना तहान लागली. यासाठी त्यांनी अनावधानाने पाणी समजून डिझेल प्यायले. स्नेहल व विराट या दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले. याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी स्नेहल आणि विराट यांची प्रकृती गंभीर दिसून आली होती. कुटुंबियाला या दोघांनीही डिझेल पिल्याचे लक्षात येताच त्यांनी दोन्ही लहान मुलांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अधिकाऱ्यांनी मुलांची पहाणी केली. मात्र उपचार निष्फळ ठरणार असल्याचे लक्षात घेऊन तसेच त्यांची प्रकृती गंभीर होत असल्याचे जाणून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविले.