चालकही तोच, वाहकही तोच अन् रोज 700 किलोमीटर प्रवास

चालकही तोच, वाहकही तोच अन् रोज 700 किलोमीटर प्रवास

साडवली - शिमगोत्सवाचा काळ..देवरूख-मुंबई किंवा देवरूख-पुणे अशी गाडी फलाटाला लागते..या गाडीत असतो एकच माणूस..भल्या मोठ्या गर्दीत तोच लावतो गाडी अन्‌ तोच काढतो तिकीट..बघायला प्रवाशांना वाटते गंमत..पण प्रवासाचे अंतर आणि त्रास पाहिला की देवरूख आगाराचा हा भीम पराक्रमच म्हणायला हवा. हा चालक कम वाहक 700 कि. मी. अंतर काटतो. 

देवरूख आगारात हे चित्र पाहायला मिळत आहे. देवरूख आगाराने गणेशोत्सवात हा फंडा वापरला. हाच फंडा पुढे मे महिना, गर्दीचा हंगाम यासाठी वापरला जाऊ शकतो. 
देवरूख- मुंबई जादा गाडी, एकच चालक अनं तोच वाहक. गाडी चालू करण्यापूर्वी त्याने प्रवाशांचे तिकीट काढायचे. गाडी सुरू करून मार्गस्थ व्हायचे. वाटेत प्रवासी थांब्यावरचे प्रवासी घ्यायचे.

रस्त्यावर लक्ष ठेवायचे व मनात कोणता प्रवासी कोठे उतरवायचा हे ध्यानात ठेवायचे ही पण कसरतच. ज्याला उतरायचे असेल त्यानेच बेल वाजवायला हवी. वृद्ध गृहस्थ असेल तर त्याने काय करावे, हा प्रश्नच. सध्या मुंबई-गोवा रस्ता चौपदरीकरण सुरू आहे. काही वेळा वाहतूक कोंडी होते. अशावेळी या चालकाची गाडी मागेपुढे करणे ही कसरतीची बाब ठरते. अशावेळी प्रवाशाने सहकार्य करताना चूक केली तर ती जबाबदारी प्रवासी घेईल का, हाही प्रश्नच. 

देवरूख-मुंबई व लगेच परत मुंबई- देवरूख हा प्रवास हा एकटा शिलेदार झेपवणार. तिकिटाची रक्कम यानेच सांभाळायची. गाडी सुरू असताना तो ती कशी संभाळणार हा प्रश्न विचारायचा नाही. ही रक्कमही तशी थोडी थोडकी नसणार. या ड्यूटीचा ताण येऊन त्याला डुलकी लागू शकते, या विचाराने खरे तर प्रवाशांची झोप उडायला हवी. चालक तोच अनं वाहकही तोच असा देवरूख आगाराच प्रवास सुरू आहे. 
 
देवरूख एसटी आगारात शिमगोत्सवात मुंबई व पुणे या मार्गावर जादा धावणाऱ्या बससाठी एकच चालक व तोच वाहक असा प्रकार होत असेल तर ते चुकीचे आहे. प्रवाशांच्या व चालकांच्या जिवाशी चाललेला हा खेळ आपण मुळीच खपवून घेणार नाही. 
- युयुत्सु आर्ते,
सामाजिक कार्यकर्ते, देवरूख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com