pali dry fish
pali dry fish

सुक्या मासळीचे भाव भिडले गगनाला

पाली : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १ जून पासून पुढील महिना दोन महिने पावसाळ्यात मासेमारी बंद असते आणि मग यावेळी मांसाहारी खाणाऱ्यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळेच या दिवसांत सुकी मासळी खरेदी व साठवण करण्याची अनेक जणांची लगबग सुरु आहे. मात्र यंदा मासळीचा पडलेला दुष्काळ आणि मासळीची आवक कमी यामुळे सुक्या मासळीचे भाव वधारले आहेत. तरीसुद्धा खवय्ये सुकी मासळी खरेदीची लगबग करत आहेत.

सध्या जिल्ह्यातील आठवडा बाजार व मासळी बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी रेलचेल सुरु आहे.  पावसाळ्याच्या चार महिन्यात भाजीपाला व मासळी यांची आवक कमी होते. आणि त्यांचे भाव देखिल वधारतात अशा वेळी घरात साठवुन ठेवलेली सुकी मासळी काढली की मग जेवण चांगले जाते. मागील वर्षभरात समुद्रात अगदी कमी प्रमाणात मासळी सापडत अाहे. सापडलेली मासळी ताजी विकण्यावर मच्छिमारांचा कल असतो. मासळी अाधीच कमी मग सुकविण्यासाठी कुठूण उरणार त्यामुळे मासळी फार कमीजण सुकवितात. त्यातच डिझेलचे व मजुरीच्या वाढलेल्या दरांमुळे यावर्षी सुक्या मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. मासळीची आवक कमी झाल्याने सुकवलेले सुरमई व पापलेट हे महागातले मासे तर बाजारातून गायबच झाले आहेत. हे ताजे मासेच कमी भेटत असल्याने सुकविण्यासाठी अधिकचे मासे मिळतच नाहीत. 

फिरत्या सुक्या मासळी विक्रेत्या दिसेनात
गावागावांत डोक्यावर टोपलीत सुकी मासळी घेवून विक्रिसाठी फिरणार्या विक्रेत्या अाता कमी झाल्या आहेत. या मासळी विक्रेत्यांकडून अनेक लोक परवडणार्या किंमतीमध्ये सुकी मासळी अापल्या दारा समोरच सुकी मासळी खरेदी करत असत. मात्र सुक्या मासळीच्या कमतरतेमुळे त्यांच्या व्यवसायावर देखिल प्रतिकूल परिणाम झाला आहे.  

सुकी मासळीचे भाव
१) साधे सोडे -  १२०० ते १४०० रुपये किलो.
२) उच्च दर्जाचे सोडे - १६०० ते १८०० रुपये किलो.
३) बांगडा -  १०० रुपयाला ४ नग
४) अंबाडी  - ५०० रुपये किलो
५) सुका जवला - ३०० रुपये किलो.
६) मोठे बोंबील - ५०० रुपये किलो.
७) छोटे बोंबील – ४०० रुपये
८) साधी सुकट - २५० रुपये किलो.
९) माकुल - ३०० रुपये किलो.
१०) पांढरी मोठी वाकटी - ४००-५०० रुपये किलो.
११) छोटी वाकटी - ३०० रुपये किलो 
१२) मांदेली -  ४०० रुपये किलो.
१३) मासे सुकट (खारे) – ४०० रुपये किलो
१४) रेपटी - २५० रुपये किलो


''पावसाळ्यात खाण्यासाठी सुकी मासळी साठवूण ठेवतो. त्यामुळे दर वर्षी या दिवसांत सुकी मासळी खरेदी करते. पण अाता एवढी महाग झालेली मच्छी खायची कशी. हा प्रश्न पडला आहे. पण घरच्या सर्व मंडळींना जेवणात मासे मटण नसले तर सुकी मासळी अावर्जुन लागते. त्यामूळे किंमत वाढलेली असली तरी सुकी मासळी खरेदी केली आहे.''
- पल्लवी मनिष पाटील, सुकी मासळी खवय्या, माणगाव

यंदा सुक्या मासळीचे भाव खुप वाढले आहेत. समुद्रात माश्यांचा दुष्काळ आहे. तसेच हवामानातील बदलामुळे मासेमारी करण्यास जास्त कोण जात नाही. त्यामुळे माश्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी सुक्या मासळीचे भाव देखील वाढले आहेत. भाव वाढले असले तरी खवय्ये आवर्जून सुकी मासळी खरेदी करतात.
- सरफराज पानसरे, सुकी मासळी विक्रेता, पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com