कोकणात महामार्गावर पीक सुकवण्याची वेळ 

पल्लवी सावंत
Saturday, 24 October 2020

नांदगाव महामार्गालगतचे भातपिक कापून चक्क महामार्गावर वाळत घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 2019 ची पुनरावृत्ती असल्याचे चित्र दिसत आहे. 

नांदगाव (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील भातपिक आणि त्यामागे हातधूवून लागलेला पाऊस पाठ सोडण्याची चिन्ह दसरा आला तरी सोडेना. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागची नुकसान करणाऱ्या पावसाची साडेसाती संपता संपेना. अशातच मिळेल ते मिळेल, असे म्हणत नांदगाव परिसरात शेतकरी सकाळच्या सत्रात पाण्यातील पिकाची काढणी करत आहे. नांदगाव महामार्गालगतचे भातपिक कापून चक्क महामार्गावर वाळत घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 2019 ची पुनरावृत्ती असल्याचे चित्र दिसत आहे. 

नांदगाव परिसरात सायंकाळच्या सत्रात पाऊस सुरू होतो. रात्री धुकं, सकाळी उन अशी सध्या वातावरणात त्रिशंकू अवस्था आहे. यामध्ये भातशेती आणि शेतकरी पुरता होरपळून निघत आहे. सकाळी गुडघाभर चिखलात जाऊन बाया बापडे कापणी करत आहेत. दुपारी पावसाचे वातावरण तयार होते. दोन घास पोटात घातले न घातले अशातच भितीपोटी मुलाबाळांसहीत शेतात धाव घेतात आणि झोडणी सुरूकरता करता आकाशातून धारा पडण्याची सुरुवात होताच शेतकऱ्यांचे पायच गळून पडतात. अशावेळी कापणी केलेलें अर्धे अधिक शेतातच टाकून डोळ्यात पाणी आणून घरी परतत असताना दिसून येतात. 

2019 चर्या पावसाने भात, नाचणी पिक पावसाने धुवून पुसून टाकले. यातून सावरतो न सावरतो तोच कोरोनाने डोक्‍यावर थैमान घातले. शेतकरी पावसाळ्यात पुन्हा शेतात उतरला. आपल्या शेतकऱ्यांच्या बोली भाषेत सांगायचे तर निदान "पेज खावन तरी दिवस काढू' असे आपल्या मुंबईत नोकरी, रोजगार हिरावलेल्या मुलांना धीराचे दोन शब्द सांगणाऱ्या आई-वडिलांना या पावसाने डोक्‍याला हात लावायची वेळ आणली. 
काही ठिकाणी जास्त दिवस भातशेती पाण्याखाली राहील्यामुळे भाताला कोंब आले. शिवाय कापणी करत असताना चिखल आणि पाणी असल्याने प्रत्त्येक कापलेली मुठ बाहेर काढावी लागत आहे. यासाठी अधिक मजूर घेवून कापणी करावी लागत आहे. यामुळे सर्व बाजूंनी शेतकरी वर्गाला नुकसान सहन करावे लागत आहे. 

दिवसा माकड, रात्री डुक्कर 
आस्मानी संकट डोक्‍यावर असताना नांदगाव परिसरात दिवसा माकडांचे कळप लोंब्यांची नासधूस करत आहेत. रात्रीच्या वेळी डुक्कर भात पिकाची अक्षरशः मळणी घालत आहेत. असे नुकसानीचे प्रकार सुरू असल्याने शेतकरी पुरता मेतकुटीस आला आहे. सध्या नांदगाव परिसरात नाचणी पिकांचेही कणीस तयार होत आहे. अशावेळी सुरू असलेल्या पावसामुळे ते पिकही जमिनीवर आडवे होऊन मोठे नुकसान होईल. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drying grain on the highway in Sindhudurg