रत्नागिरीत रापणीला चांगले दिवस ; आठवड्यातून एकदा मिळते लाखाची मिक्‍स मासळी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

वाऱ्यामुळे समुद्रात नौका हेलकावे घेत असल्याने गिलनेट, फिशिंगच्या अनेक बोटी बंदरातच उभ्या आहेत.

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर वाहत असलेल्या वेगवान वाऱ्यांमुळे मच्छीमारीत अडथळे निर्माण झाले आहेत. वाऱ्यामुळे समुद्रात नौका हेलकावे घेत असल्याने गिलनेट, फिशिंगच्या अनेक बोटी बंदरातच उभ्या आहेत. पर्ससिननेट, ट्रॉलिंगसारख्या नौका समुद्रात रवाना झाल्या; मात्र मासळी किनाऱ्याकडे वळल्याने रत्नागिरीत रापणीला दिवस चांगले आहेत. आठवड्यातून एकदा लाखाची करंबट (मिक्‍स मासळी) सापडत आहे.

हवामान विभागाकडून आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील किनारी भागात वेगवान वारे वाहत आहे. ज्या मच्छीमारी नौका डोल नाही, अशा फिशिंग, गिलनेटवाल्या नौका वाऱ्याचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी समुद्रात जाण्याचा धोका पत्करण्यापेक्षा बंदरात राहणे पसंत केले. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. पाऊस, वारा यामुळे मच्छीमारीत अडथळा असून पुढील तीन दिवस असेच वातावरण राहील, असा अंदाज आहे. मच्छीमारांनाही सतर्क राहण्याच्या सूचना आहेत.

चार दिवसांपूर्वी म्हाकूळ, दोडी, पापलेट अशी मासळी बारा वावात मिळत होती. त्यावर पाणी फेरले गेले आहे. वातावरण बिघडले असले तरीही पर्ससिननेट, ट्रॉलिंगवाले मासेमारीसाठी रवाना होत आहेत. रविवारी (११) सायंकाळी समुद्रात गेलेल्या नौका परतल्या. सोमवारी काही नौका रवाना झाल्या आहेत. त्यांना रिपोर्ट लागलेला नाही. गेल्या महिन्याभरात रत्नागिरीतील रापणीने मासेमारी करणाऱ्यांचा अच्छे दिन आलेत. रत्नागिरीत असलेल्या पाच रापणींना आठवड्यातून एकदा लाख रुपयांच्या मासळीची लॉटरी लागत आहे. लाखाच्या मासळीत दोडी, सौदाळा, बोंबील, पापलेट, म्हाकुळ, पातुर्डा, खवला, चिंगळं यासारखी मिक्‍स स्वरुपाची (करंबट) मासळी मिळत आहे.

मासळी किनाऱ्यावर

प्रखर विजेचा उजेड टाकून होणाऱ्या (एलईडी) मासेमारीवरही बंधने असल्यामुळे माशांची पैदास होत आहे. वातावरणात बदलामुळे मासळी किनाऱ्याकडे वळलेली आहे. त्याचा फायदा रापणीवाल्यांना होत असल्याचा अंदाज व्यक्‍त होतोय.

"वातावरण बिघडल्यामुळे कासारवेली येथील अनेक मच्छीमारी नौका गेले दोन दिवस बंदरातच उभ्या आहेत. वारा आणि पावसामुळे समुद्रात जाळे टाकून मासेमारी करणे शक्‍य नाही."

 - अभय लाकडे, मच्छीमार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to atmosphere in see area fishing business also stopped but the rapan fishing increases in ratnagiri