
Alibaug Dumping ground fire : धुरामुळे कोंडला श्वास
अलिबाग : शहरातील डम्पिंग ग्राउंडला सोमवारी रात्री लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. धुरापासून बचावासाठी काहींना मंगळवारी दिवसभर दारे-खिडक्या बंद ठेवाव्या लागल्या.
शहरातील काही नागरिक सोमवारी रात्री दहानंतर जेवण आटोपून कुटुंबीयांसमवेत गप्पा गोष्टी करीत होते. काही जण झोपण्याच्या तयारीत होते. अचानक शहरामध्ये धूर पसरला. धुरामुळे काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तर काहींच्या डोळ्यांत जळजळ सुरू झाली.
अचानक आलेल्या धुरामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले होते. पहाटेपर्यंत धूराचे लोण उठत असल्याने अनेक नागरिकांना अस्वस्थ वाटू लागले.अखेर मंगळवारी सकाळी अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, माजी गटनेते प्रदीप नाईक, माजी नगरसेवक वृषाली ठोसर, अनिल चोपडा, संजना किर यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्या वेळी उपाययोजना करण्यासाठी कोणताही यंत्रणा नसल्याचे लक्षात आले. दुपारी एक वाजला तरीही डंपिग ग्राउंडमध्ये आग धुमसत होती.
अलिबागमधील दोन दुकाने खाक
अलिबाग ः अलिबाग शहराजवळ चेंढरे बायपास येथील दोन दुकानांना मंगळवारी सकाळी आग लागली. स्पेअर पार्टच्या दुकानासह वाहन दुरुस्तीचे दुकान यात पूर्णतः खाक झाले. आगीमुळे दुकानाजवळ उभ्या कारचेही नुकसान झाले. अलिबाग नगरपरिषद व थळ येथील आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात यश आले.
आगीत दोन्ही दुकानांचे सुमारे एक कोटीपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास दुकानातून धूर निघू लागला. अग्निशमन दलाला बोलावण्यात आल्यावर तब्बल तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. चेंढरे बायपास येथील वाहतूक काही काळासाठी अन्य मार्गावरून वळविण्यात आली होती.