
कोयना येथील भूकंप नियंत्रण केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या तीन भूकंपांचा केंद्रबिंदू कोयनेपासून 41 किलोमीटरवर खेडनजीक धामणंद येथे सहा किलोमीटरवर होता.
चिपळूण(रत्नागिरी) : खेड तालुक्याला काल (ता. 18) पहाटे भूकंपाचे चार धक्के बसले. यामुळे खेड शहर व तालुका धास्तावलेला आहे. याआधी चिपळुणात वारंवार धक्के अनुभवले जातात. मात्र, या वेळी खेड तालुक्यात जोरदार धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदूही खेड तालुक्यात होता, हे या वेळचे वैशिष्ट्य.
पहाटे 4.11 ते 6.22 या कालावधीत एकूण चार धक्क्यांची नोंद झाली. तालुक्यातील सुमारे 40 हून अधिक गावांना हे धक्के जाणवले. याला जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेने दुजोरा दिला.
कोयना येथील भूकंप नियंत्रण केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या तीन भूकंपांचा केंद्रबिंदू कोयनेपासून 41 किलोमीटरवर खेडनजीक धामणंद येथे सहा किलोमीटरवर होता. शेवटच्या धक्क्याचा केंद्रबिंदू खोपी येथे असल्याची माहिती मिळाली. सर्वांत लहान धक्का 2.3, तर सर्वांत मोठा धक्का 3.1 रिश्टर स्केलवर होता. सुदैवाने या धक्क्यांनी कुठेही पडझड झालेली नाही. मात्र, अनेक ठिकाणी धक्क्यामुळे जागे होऊन काही लोक घरातून बाहेर धावले.
भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगर येथील धरणापासून 41.6 किलोमीटर, तर शेवटच्या धक्क्याचा केंद्रबिंदू 42 किलोमीटरवरील खोपी येथे होता. तालुक्यातील अस्तान, खोपी, शिरगाव, सवेणी, मोहाणे, आंबवली, बिजघर, तिसंगी, एनवरे, ऐनवली, तळे अशा सुमारे 40 हून अधिक गावांत जाणवला. भूकंपाआधी तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी (ता. 17) मध्यरात्री मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. पहाटे भूकंपाच्या कालावधीतही पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
सकाळी साडेपाचच्या सुमारास भूकंपाचा हादरा जाणवला. पुन्हा दुसरा हादरा बसला. त्यानंतरचा तिसरा हादरा सौम्य होता.
- केतकी शिर्के, भरणे, खेड
पहाटे जमीन हादरू लागली. घरातल्या भांड्यांचा आणि छतावरील पत्र्यांचा आवाज येऊ लागला. त्यामुळे भीती वाटली. हादरा कमी झाल्याने हायसे वाटले.
- संदीप कदम, आंबवली, खेड
असे बसले धक्के
4.11 मिनिटांनी 2.6 रिश्टर स्केल
5.29 मिनिटांनी 3.1 रिश्टर स्केल
5.11 मिनिटांनी 2.8 रिश्टर स्केल
6.22 मिनिटांनी 2.3 रिश्टर स्केल
संपादन-अर्चना बनगे