सुधागडमध्ये भूकंप...? आदिवासीवाडीजवळ मोठे भूस्खलन

sudhagad
sudhagad

पाली ः सुधागड तालुक्यातील ताडगाव येथील कोटबेवाडी आदिवासी वाडीजवळ रविवारी (ता. 4) पहाटे तीनच्या सुमारास मोठे भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खचून जमिनीला लांब व रुंद भेगा आणि खड्डे पडले आहेत. यावेळी परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मंगळवारी (ता. 6) पाली-सुधागड तहसीलदारांनी घटनास्थळाची पाहणी करून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे. 

सध्याच्या अतिवृष्टीमुळे कोटबेवाडी आदिवासीवाडीपासून शंभर किमीच्या अंतरावर उत्तरेकडे माळरान जमीन दबल्यामुळे जमिनीच्या उताराच्या ठिकाणी सुमारे 90 मीटर लांब तर दुसरी 40 मीटर लांब, 15 मीटर रुंदीची व 10 मीटर खोल भेग व इतरही अनेक छोट्या-मोठ्या भेगा आणि खड्डे पडले आहेत. यावेळी वृक्ष देखील उन्मळून पडले आहेत. असा मोठा प्रकार घडल्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना असावी. 

या घटनेमुळे ताडगाव ग्रामस्थ व आदिवासी वाडीतील लोक भयभीत झाले आहेत. दुर्घटना घडल्यावर रविवारी सकाळी ग्रामस्थ घटनास्थळी गेले असता तेथे त्यांना या जमिनीला पडलेल्या भल्या मोठ्या भेगा व खड्डे दिसले. ताडगाव, कोटबेवाडी येथील काही ग्रामस्थ आणि मोहावाडीतील शाळकरी मुले व तरुण तसेच आजूबाजूच्या लोकांनी रात्री जमीन हादरल्यासारखी झाली व आवाज आला असे सांगितले. काहींना हा भूकंप झाल्याचे वाटत आहे. अनेकजण या घटनेमुळे घाबरले आहेत. या ठिकाणची पाहणी करण्यासाठी तहसीलदार दिलीप रायन्नावार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच छब्या जाधव यांच्यासह केतन साठे, तंटामुक्ती अध्यक्ष राकेश साठे आदींनी घटनास्थळी भेट दिली. 

पुनर्वसनाची मागणी- 
त्या रात्री एकदम वेगळा आवाज झाला. जमीन व घर हादरल्यासारखी झाली. घरातील मंडळी झोपेतून उठून बसली. काय झाले कळायला मार्ग नव्हता. वीज पडली असावी असे वाटले. आणि एवढ्या रात्री कोणाला उठवणार त्यामुळे उजाडल्यावर पाहण्यास गेलो. या घटनेने लोक खूप घाबरले आहेत, असे ताडगावचे ग्रामस्थ प्रकाश साठे यांनी सांगितले. 

दरड कोसळण्याच्या घटना - 
सध्याच्या अतिवृष्टीमुळे सुधागड तालुक्यातील करंजाई (चिखलगाव), पेंढारमाळ (घोटवडे), हरनेरी, चेरफळवाडी (उद्धर), ढोकळेवाडी (खंडपोली) आणि भालगुल या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील जमिनीचे सखोल सर्वेक्षण भूगर्भ शास्त्रज्ञांकडून व्हावे अशी मागणी तहसीलदारांनी अहवालात केली आहे.  

शासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे. तसेच येथील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे पुनर्वसन देखील केले पाहिजे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी ताबडतोब दखल घेत घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांना योग्य सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार.
-राकेश साठे, तंटामुक्ती अध्यक्ष, ताडगाव

या लोकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे. पण सध्या तरी स्थलांतर करण्याची आवश्यकता वाटत नाही. दरड कोसळण्याच्या घटना पाहता तालुक्यातील जमिनीचे सखोल सर्वेक्षण भूगर्भ शास्त्रज्ञांकडून व्हावे, विशेषतः ताडगाव येथील सर्वेक्षण तत्काळ व्हावे अशी मागणी केली आहे.\
-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com