प्रेरणादायी! जलचरांचा प्रथम विचार, मळगावच्या मूर्तीकाराचा अनोखा प्रयोग

भूषण आरोसकर
Monday, 24 August 2020

गेली 19 वर्षे ते मूर्ती व्यवसायामध्ये सक्रिय असून कागदी लगद्यापासून मूर्ती बनविण्यामध्ये आतापर्यंत ते कार्यरत होते. पीओपी आणि मातीच्या मूर्तीं ऐवजी पर्यावरणपूरक अशा कागदी लगद्याच्या अनेक मूर्ती त्यांनी घडविल्या आहेत.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कागदी लगद्याच्या इको-फेंडली गणपतीच्या यशस्वी प्रयोगानंतर मळगाव येथील मूर्तिकार विलास मळगावकर यांनी एक आगळा-वेगळा पर्यावरणपूरक प्रयोग समोर आणला आहे. शेतातील माती, गायीचे शेण आणि गोमूत्र यांच्या मिश्रणातून सर्वांगसुंदर पर्यावरणपूरक गोमेय मूर्ती त्यांनी घडविल्या आहेत. शहरात सदनिकेत राहणाऱ्या शहरवासीयांनाही छोट्या कुंडीतही श्रींची मूर्ती विसर्जन करता येणार आहे. अशा प्रकारच्या मूर्ती घडविण्यामागे जलचर प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा धोका उत्पन्न होऊ नये, हाही महत्त्वाचा उद्देश ठेवला आहे. 

पर्यावरण विरोधक पीओपीच्या मूर्ती असल्याने पर्यावरणपूरक मातीच्या मुर्त्या वापरात येण्यासाठी मुर्तीकार संघटना व अनेक नागरिक आवाहन करत असतात; मात्र अलीकडेच मातीच्या मूर्तींची आकर्षकता वाढण्यासाठी विविध रंगाचे खडे, ज्वेलरी यांचा समावेश केला जात आहे. काही मूर्ती रंगविण्यासाठी जे रंग वापरले जातात त्यातही जलचर प्राण्यांना धोकादायक असलेले विघातक घटक समाविष्ट केलेले असतात. या सर्वावर तोडगा म्हणून मळगाव येथील ज्येष्ठ मूर्तिकार विलास मळगावकर यांनी शेतातील माती, गायीचे शेण आणि गोमूत्र असे एकत्रित केलेले या मिश्रणातून आगळी वेगळी संकल्पना पुढे आणली आहे. तिन्हीच्या मिश्रणातून त्यांनी अनेक आकर्षक व सुबक मूर्ती घडविल्या आहेत.

गेली 19 वर्षे ते मूर्ती व्यवसायामध्ये सक्रिय असून कागदी लगद्यापासून मूर्ती बनविण्यामध्ये आतापर्यंत ते कार्यरत होते. पीओपी आणि मातीच्या मूर्तीं ऐवजी पर्यावरणपूरक अशा कागदी लगद्याच्या अनेक मूर्ती त्यांनी घडविल्या आहेत. मुंबई, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि स्थानिक स्तरावर जवळपास अडीचशे ते तीनशे मूर्ती दरवर्षी ते घडवितात. आपल्या नवीन कल्पनेची संकल्पना ग्राहकांना समजावी यासाठी त्यांनी गोमेय मूर्तींचे मोजके नमुने मुंबई, गोवा याठिकाणी असलेल्या ग्राहकांना पाठविले होते. कागदी लगद्यापासूनच्या मूर्ती बनविण्यास ऑक्‍टोबर, नोव्हेंबरपासून सुरुवात करतात; मात्र गोमेय मुर्त्यांची संकल्पना मेमध्येच त्यांनी राबविल्याने त्याचा प्रचार होण्यास कमी कालावधी त्यांना मिळाला. असे असले तरीही ज्या ग्राहकांना त्यांनी नमुने म्हणून पाठविले त्यातील अनेकांनी गोमेय संकल्पनेच्या मूर्त्यांची मागणी केली. 

त्यांची मूर्ती व्यवसायामध्ये सहकार्य करत असलेली मुलगी अपूर्वा हिनेही फेसबुक व इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाद्वारे ही संकल्पना जगासमोर व्यक्त केली. अवघे आठ ते दहा इंच आकाराची ही श्री गणेश मूर्ती विसर्जनाच्या दिवशी आपण एका कुंडीतील रोपाच्या मुळातही विसर्जित करू शकतो. शहरातील विशेष करून छोट्या खोलीत व सदनिकांमध्ये राहणाऱ्या भाविकांना गोमेय श्री गणेश मूर्ती पूजन व विसर्जन करताना सुलभता प्राप्त होऊ शकते. 

गणेश मूर्ती श्रद्धेचे रूप आहे; मात्र अलीकडच्या काळात श्रद्धा संपवून पुढे चाललोय. मूर्तीची आकर्षकता वाढविण्यासाठी प्लास्टिकचा वापर वाढत असून पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. आपण कोकणात राहतो. त्यामुळे श्रद्धा जपताना निसर्गाची श्रीमंतीही तेवढीच जपणे खूप गरजेचे आहे.'' 
- विलास मळगावकर, पर्यावरण पूरक मूर्तिकार 

पर्यावरणातील कोणत्याही घटकाला हानी पोहचू नये, यासाठी पर्यावरण पूरक सण, उत्सव व्हायला हवे. निसर्गाची संपत्ती मूर्ती व्यवसायात उतरणाऱ्या भावी तरुण मूर्तिकारांनीही जपली पाहिजे. - अपूर्वा मळगावकर 

नैसर्गिक रंगकामाचा मानस 
श्री. मळगावकर यांनी जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघ, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक आणि भगीरथ प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या मूर्तिकला व्यवसाय मार्गदर्शन शिबिरामध्ये कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीविषयी जवळपास 350 लोकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी राबवलेली गोमेय या मूर्तीची संकल्पनाही ते आता पुढील शिबिरामध्ये मार्गदर्शनातून पुढे आणणार आहेत. त्यातून युवकांनी अशा पर्यावरणपूरक मूर्ती कलेत पुढे यावे, असाही त्यांचा मानस आहे. गोमेय ही मूर्ती एक रंगात रंगवीत असले तरी यावर्षी ते पुढील मुर्त्या नैसर्गिक घटकातून तयार केलेल्या रंगातून रंगविण्याचा प्रयोग करणार आहेत. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eco-friendly ganesh idol from malgaon sculptor konkan sindhudurg