अत्यंत परिश्रमाने जपलाय वेगळेपणा, मूर्तिकाराच दहा वर्षांच तप, वाचा...

नेत्रा पावसकर
Thursday, 27 August 2020

अशाप्रकारची कला जोपासना करून त्यात सातत्य ठेवणाऱ्यामधील एक म्हणजे हरहुन्नरी कलावंत उदय दुदवडकर. बुरंबावडे येथे ते 35 वर्षांपासून गणेश मूर्ती तयार करत आहेत.

तळेरे (सिंधुदुर्ग) - बुरंबावडे (ता. देवगड) येथील अष्टपैलू कलाकार उदय दुदवडकर हे दहा वर्षांपासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारत आहेत. विशेष म्हणजे ही मूर्ती सव्वा ते दीड फुट असते. वयाच्या 18व्या वर्षांपासून कोणतेही मूर्तीकलेचे शिक्षण न घेता त्यांनी मूर्तीकला अवगत केली आहे. सुमारे 35 वर्षे त्यांनी ही कला अत्यंत परिश्रमाने वेगळेपणा जोपासत टिकवली आहे. 

परंपरागत मूर्तीकला जोपासणारे कलावंत गावोगावी आढळतात; मात्र उपजतच अंगात असलेली कला जोपासणारे आणि ती वाढवणारे कमीच आहेत. अशाप्रकारची कला जोपासना करून त्यात सातत्य ठेवणाऱ्यामधील एक म्हणजे हरहुन्नरी कलावंत उदय दुदवडकर. बुरंबावडे येथे ते 35 वर्षांपासून गणेश मूर्ती तयार करत आहेत.

याबाबत माहिती देताना ते सांगतात की, मुंबईला असताना वयाच्या 10व्या वर्षी विसर्जन केलेल्या गणपतीची माती घेऊन मी दुर्गा मातेची मूर्ती तयार करू लागलो. अर्थात त्यावेळी ती केवळ एक ते दीड फुटाची मूर्ती असायची. त्यावेळी नवरात्रौत्सवात ती मूर्ती वरळी कोळीवाडा येथे बसवली जायची. आणि घरातल्यांची भीती असल्यामुळे मी मूर्ती समुद्र किनाऱ्यावरच बनवायचो. 

एक दिवस उशिरापर्यंत घरी गेलो नसल्यामुळे बाबा शोधायला आले आणि पाहिले तर मी मूर्ती तयार करत होतो. त्याक्षणी माती घेऊन मला घरी यायला सांगितले. आणि त्यानंतर बाबांची भीती गेली. बाबा मला न ओरडता मदत करू लागले. त्यावेळी मी मूर्ती करायचो आणि ती बाबा अत्यंत तन्मयतेने पाहायचे. त्यानंतर गणपती करणाऱ्या मूर्तिकारांकडून बाबा माझ्यासाठी मातीही घेऊन यायचे. रंग व इतर साहित्य आणून देऊ लागले. 

1977ला आम्ही गावी आलो आणि 1980 पासून आमच्या घरचा गणपती वडिलांच्या प्रेरणेने मीच करू लागलो. अर्थात त्यावेळी गणपती वारुळाच्या लाल मातीचा असायचा. त्यावेळी आमचा गणपती पाहून गावातल्या अनेकांनी गणपती करायचा मला आग्रह केला. एकवर्षी जवळपास 20 गणपती केलेही; मात्र त्यादरम्यान कॉलेज सुरू असल्याने वेळेत गणपती झाले; मात्र खूपच ओढाताण करावी लागली.

त्यामुळे पुढल्या वर्षांपासून इतर गणेश मूर्ती करणे बंद केले. ज्यावेळी इको फ्रेंडली हे नावही ऐकलेले नव्हते त्या 2010 पासून इको फ्रेंडली गणपती करायला सुरुवात केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. माती, कागदाचा लगदा किंवा लाकडी भुसा, नारळाच्या किश्‍या, काथा यांचा हा गणपती करू लागलो. अर्थात त्यामागे निसर्गमैत्री हा उद्देश तर होताच शिवाय त्यामागे शास्त्रीय कारणही होते. 

लहान मूर्तीमागे शास्त्रीय कारण 
भाद्रपदात शुक्‍ल पक्षातील चतुर्थीचे गणेश पूजन हे 'पार्थिव गणेश पूजन' म्हणून संबोधले जाते व शास्त्रसंमत आहे. शास्त्राप्रमाणे गणपतीची मूर्ती एक ते दीड फुटापर्यंत असली पाहिजे. ती पार्थिव (मातीची) असावी शिवाय ती विसर्जनानंतर पाण्यात त्वरित विरघळली पाहिजे. मोठमोठ्या गणेश मंडळातील गणेश मुर्तीही कितीही मोठी असली तरी ती फक्त पाहण्यासाठी असते आणि पूजन करायची गणेशमूर्ती हि एक ते दिड फुटापर्यंतच असलेली दिसून येते. त्यामुळे मी तयार करत असलेली गणेश मूर्ती ही एक ते दीड फुटाचीच असते. येथील बलोपासना या अध्यात्मिक कार्यक्रमाचे प्रणेते व प्रबोधक असणारे उदय दुदवडकर घरोघरीही मूर्ती बसवताना एक ते दीड फुटाचीच व मातीची (पार्थिव) गणेश मूर्ती स्थापित करावी, असे आवाहनही करतात. 

दुदवडकर करत असलेली गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ परीसच्या मूर्तीपेक्षा अत्यंत माफक खर्चात तयार होते. साधारणत: दिड ते दोन किलोची असणारी ही मूर्ती कोणीही सहज घेऊन जाऊ शकतो; मात्र यासाठी मेहनत खूप असल्याचे ते सांगतात. साधारण एक किलो शाडू मातीमध्ये रद्दीच्या पेपरचा लगदा टाकून तयार होणाऱ्या मिश्रणापासून ही मुर्ती तयार केली जाते. 
पूर्णपणे हाती करण्यात येणाऱ्या या गणेश मूर्तीसाठी दोन ते तीन दिवस पेपरची रद्दी पाण्यात भिजवून त्याचा लगदा तयार केला जातो. मातीला चिकटपणा येण्यासाठी तो लगदा मातीत एकत्र करून पिठासारखे मळले जाते. आणि त्यापासून ही गणेश मूर्ती तयार केली जाते. विशेष म्हणजे या मूर्तीसाठी ते सर्व घरातीलच साहित्य वापरतात. दाबन, स्क्रू ड्रायवर, हाताची नखे, माचीसची कांडी, लाकडी पट्टी व चिवा काटी यापासून बनविलेली हत्यारे यांच्या सहाय्याने ते ही गणेश मूर्ती घडवतात. अशाप्रकारची गणेश मूर्ती करण्याचे वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणतात कि, याप्रकारची केलेली गणेश मूर्ती तुटण्याची भीती नसते. एकदा मूर्ती सुकली कि त्यात प्रचंड मजबूतपणा येतो. शिवाय वजनाने हलकी असल्यामुळे ती कोणीही सहज घेऊ शकतो. शिवाय आर्थिकदृष्ट्या सर्वांनाच परवडणाऱ्या असतात. कोणत्याही साच्याचा वापर न करता ही मूर्ती हाती करत असल्यामुळे याला वेळही खूप द्यावा लागतो इतकेच. सर्वांत महत्वाचे म्हणजे विसर्जनानंतर अवघ्या काही वेळातच ही मूर्ती पूर्णपणे पाण्यात विरघळते. 

संस्कार वर्गातून मार्गदर्शन 
उदय दुदवडकर मूर्तीकलेत जसे पारंगत आहेत. त्याचप्रमाणे ते उत्कृष्ट छायाचित्रकार, चित्रकार, अंकविद्या,ज्योतिष विद्या, साहित्य तसेच अनेक शास्त्रे यांमध्ये पारंगत आहेत. ते तळेरे येथे बलोपासना संस्कार वर्ग घेतात. त्यामध्ये लहान मुलांना एका मिनिटात मातीचा नागोबा तयार करणे, मातीचा गणपती बनवणे, हस्तकला, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, व्यक्तिमत्व विकास अशा विविध कलांचे तसेच योगासने, गणित, इंग्रजी, मराठी, विज्ञान इत्यादी पाठ्यपुस्तकीय विषयांचे ते विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन करतात. तसेच युवा व प्रौढांना आध्यात्मिक मार्गदर्शन करतात. 

यंदाचा बाप्पा असा... 
यावर्षीचा गणपती बाप्पा पुर्णपणे इको फ्रेंडली असुन तो बनविण्यासाठी वर्तमानपत्रांच्या कागदांचा लगदा, गवत, पालापाचोळा, काटक्‍या यांपासून तयार करण्यात आलेली आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eco friendly sculpture konkan sindhudurg