लाॅकडाउन ः सिंधुदुर्गात कुणाला तारले़ कुणाला मारले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Effect of lockdown in sindhudurg

कोरोनाचा संकटाचा फटका शेतीसह सर्वच उद्योग, व्यवसायांना बसला. अनेकांचे रोजगार हिरावले गेले. अनेकजण कर्जबाजारी झाले; मात्र या काळात जीवनावश्‍यक वस्तूंचा व्यवसाय तेजीत आला.

लाॅकडाउन ः सिंधुदुर्गात कुणाला तारले़ कुणाला मारले!

कणकवली : कोरोनामुळे जग मंदीच्या खाईत लोटले आहे. विविध उत्पादनांची कमी झालेली मागणी, रोजगार संधी नसल्याने घटलेली क्रयशक्‍ती याचा मोठा फटका शहरासह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोनामुळे अनेक घटक प्रभावित झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाही त्याला अपवाद नाही. लॉकडाउनने काही संधीही निर्माण केल्या आहेत. 

कोरोनाचा संकटाचा फटका शेतीसह सर्वच उद्योग, व्यवसायांना बसला. अनेकांचे रोजगार हिरावले गेले. अनेकजण कर्जबाजारी झाले; मात्र या काळात जीवनावश्‍यक वस्तूंचा व्यवसाय तेजीत आला. गावठी आठवडा बाजारातील विक्रेत्यांना चांगला व्यवसाय मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. दुसरीकडे आईस्क्रिम पार्लर, कापड्यांची दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल उद्योग तसेच लग्न आणि त्याअनुषंगिक विविध व्यवसायांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या शक्‍यतेने देशात मार्चपासूनच लॉकडाउन सुरू झाला. आता लॉकडाउनमध्ये शिथिलता असली तरी निर्बंध कायम आहेत. एस.टी.सह वाहतूक व्यवस्था पूवर्वत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरातील बाजारपेठांत येणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. लॉकडाउनपूर्वी ग्रामीण ग्राहक सर्व जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदीही आठवडा बाजारासह शहरातील दुकानांमधून करत. कोरोना प्रादुर्भावानंतर मात्र ग्राहकांची शहराकडील धाव थांबली आणि जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी गावातील दुकानांमध्येच होऊ लागली. तेथील दुकानांमध्येही सर्व जिन्नस उपलब्ध होऊ लागले. एवढेच नव्हे तर डबघाईला आलेली ग्रामीण भागातील जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने तेजीत सुरू झाली आहेत. 

कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा दररोज शहराशी होणारा संपर्क तुटला आणि इथल्या नागरिकांचा वावर गाव किंवा पंचक्रोशीपुरता मर्यादीत झाला. यात गावात किंवा पंचक्रोशीत होणारे आठवडा बाजारात स्थानिकांची गर्दी वाढली. गावात उत्पादित होणारा भाजीपाला व अन्य चीजवस्तूंना ग्रामीण भागातील बाजारामध्ये चांगला दर मिळाला. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे. 

हे पण वाचा -कणकवली बसस्थानकाबाबत परिवहन मंत्र्यांचे महत्त्वाचे विधान -

कोरोना संकटामुळे आईस्क्रिम पार्लर, कापड दुकाने, रेस्टारंट, हॉटेल, लॉजिंग आदी क्षेत्रातील व्यवसाय अजूनही मंदीच्या खाईत राहिले आहेत. पावसाळी साहित्य खरेदीसाठी सध्या बाजारपेठांत गर्दी होत असली तरी मोजक्‍याच खरेदीला ग्राहकांची पसंती आहे. उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्याने ग्राहकांच्या खरेदीवरही मर्यादा आल्या आहेत. 

"लॉकडाउनच्या सुरवातीच्या दिवसात सर्वच व्यवहार ठप्प झाले. भाजीपाला उत्पादनाचे प्रचंड नुकसान होण्याची भीती होती. मात्र आठवडा बाजारातच मोठी मागणी झाली. त्या नंतर शहरातही भाजी विक्रीला मुभा मिळाली. ग्राहकांकडून परजिल्ह्यातील भाजीपाल्याऐवजी जिल्ह्यातीलच भाजी खरेदीला अधिक पसंती मिळाली. त्यामुळे लॉकडाउन कालावधीत आणि त्यानंतरही ग्रामीण भागातील आम्हा शेतकऱ्यांकडील उत्पादनांना चांगली मागणी राहिली आहे.'' 
- प्रशांत राणे, जानवली- घरटणवाडी 

हे पण वाचा -शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे कोकणवासीयांच्या अशा पल्लवित

Web Title: Effect Lockdown Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sindhudurg
go to top