esakal | कोकणात भेंडीच्या एका झाडापासून दीड किलो उत्पादन ; भाताचे रत्नागिरी चार, लाल भेंडीचे नवीन वाणांची नोंदणी मंजूर....
sakal

बोलून बातमी शोधा

Efforts of Konkan Agricultural University search by New rice and varieties of okra

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रयत्नांमुळे वाणांची नोंदणी मंजूर... 

 

कोकणात भेंडीच्या एका झाडापासून दीड किलो उत्पादन ; भाताचे रत्नागिरी चार, लाल भेंडीचे नवीन वाणांची नोंदणी मंजूर....

sakal_logo
By
चंद्रकांत जोशी

दाभोळ (रत्नागिरी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रयत्नांमुळे रत्नागिरी चार व लाल भेंडी या वाणांची नोंदणी मंजूर झाली आहे. वनस्पती जाती व शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण (नवी दिल्ली) यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या भात पिकाच्या ‘रत्नागिरी ४’ तसेच अडेली (वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) येथील शेतकरी अनंत दिगंबर प्रभु आजगावकर यांनी विकसित केलेल्या ‘लाल भेंडी’ या दोन वाणांच्या वनस्पती जाती व शेतकरी अधिकार संरक्षण कायदा २००१ अंतर्गत नोंदणी मंजूर केली आहे.


वनस्पती जाती व शेतकरी अधिकार संरक्षण, प्राधिकरण कायदा (२००१) अंतर्गत वनस्पती जातींचे संरक्षण, शेतकरी तसेच वनसंपत्ती उत्पादकांचे हक्‍क आणि संरक्षण यासाठी अस्तित्वात आहे. या कायद्यान्वये विविध पीक वाणांच्या विकासासाठी व नवीन वाण निर्मितीसाठी पीक पैदासकार शास्त्रज्ञ, तसेच शेतकरी यांना प्रोत्साहन दिले जाते. तसेच वाणांचे या कायद्याद्वारे संरक्षण केले जाते.भात पिकाचा रत्नागिरी ४ हा लांबट, बारीक, निमगरवा भात वाण असून १२५ ते १३० दिवसात येतो. विद्यापीठामार्फत या दोन्ही वाणांचे अर्ज करण्यात आले होते. अनंत प्रभुआजगावकर व्यवसायाने शेतकरी असून, त्यांनी विकसित कलेला वाण संरक्षित होण्यासाठी विद्यापीठाने विशेष प्रयत्न आणि आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण केली.

हेही वाचा- अखेर दोन महिन्यांनी गुहागरमध्ये त्याने केलीच एंट्री... -


लाल भेंडी जातीची लागवड खरीप मध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व उन्हाळ्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात करावी. ही जात प्रतिकूल तापमान सहन करू शकते. पीक कालावधी १२० ते १३० दिवसांचा असून काढणी सुरू व्हायला ४०-५० दिवस लागतात. भेंडीच्या फळांचा रंग लालसर असून लांबी ७ ते ८ इंच व उत्पन्न एक त दीड किलो प्रतिझाड आहे. या पीक वाणांच्या नोंदणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, तसेच संशोधन संचालक, डॉ. पराग हळदणकर यांनी मार्गदर्शन केले. वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मुराद बुरोंडकर, डॉ. व्ही. व्ही. दळवी, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र शिरगावचे प्रभारी अधिकारी डॉ. बी. डी. वाघमोडे, संशोधन उपसंचालक डॉ. संजयकुमार तोरणे यांनी संदर्भात प्रयत्न केले. 

हेही वाचा- साडेसात एकर जमीन नापीक, भरपाईची प्रतीक्षा, जाणून घ्या नेमक प्रकरण काय

पौष्टिक आणि कमी चिकट असल्याने मागणी
लाल भेंडी या जातीची लागवड जम्मू आणि काश्‍मीर वगळता संपूर्ण भारतात केली जाऊ शकते. ही जात पौष्टिक व शिजवल्यानंतर कमी चिकट असल्याने बाजारात तिला जास्त मागणी आहे. या पिकांच्या नोंदणीमुळे राज्यात तसेच राष्ट्रीय पातळीवर बाजारात जास्त मागणी येईल व शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, असा आशावाद विद्यापीठाकडून व्यक्‍त केला जात आहे.

संपादन - अर्चना बनगे