चिपळूण पालिकेत साडेआठ कोटीची कामे तांत्रिक अडचणीत 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

शहरातील 19 विकासकामांवर चुकीच्या पद्धतीने वाढीव खर्च झाल्याची तक्रार महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. नगराध्यक्षांनी मनमानीपणे खर्च केल्याचा आरोप करत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली.

चिपळूण ( रत्नागिरी ) - शहरातील विकासाची साडेआठ कोटीची वाढीव कामे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी ठेकेदारांकडून करून घेतली. कामे पूर्ण झाल्यानंतर नगरसेवकांनी रंग बदलले. पूनर्नियोजनाच्या सभेतही वाढीव कामांना महाविकास आघाडीने विरोध केला. त्यामुळे साडेआठ कोटीची कामे तांत्रिक अडचणीत सापडली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर या कामांचे भवितव्य अवलंबून आहे. 

शहरातील 19 विकासकामांवर चुकीच्या पद्धतीने वाढीव खर्च झाल्याची तक्रार महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. नगराध्यक्षांनी मनमानीपणे खर्च केल्याचा आरोप करत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार अर्थसंकल्पाच्या पूनर्नियोजनाची बैठक पालिकेत घेण्यात आली. 

या बैठकीत अपक्ष केळस्कर यांनी तरतूद असलेल्या विकासकामांनाच मंजुरी देणे तसेच वाढीव कामांना मंजुरी न देण्याचा ठराव केला. संख्याबळाच्या आधारे महाविकास आघाडीने तो ठराव जिंकला; मात्र त्याचे दूरगामी वाईट परिणाम होतील, असा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेविका शिवानी पवार यांनी सभेत दिला. जनतेचा निधी जनतेच्या कामासाठी खर्च केला जात असताना आपण एकमेकांची उणीदुणी का काढत बसलो आहोत, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी यांनी केलेली सूचनाही महाविकास आघाडीला अमान्य असेल तर याबाबत जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील, असे सांगितले आहे. केलेल्या कामांची बिले मिळावीत म्हणून ठेकेदारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे अहवाल मागितला तर प्रशासानाकडून काय अहवाल दिला जाईल, याची सर्वांना उत्सुकता आहे. 
 

अपक्ष नगरसेवक केळस्कर फार हुशार आहेत. सभागृहात मांडण्यासाठीचा ठराव ते घरातून लिहून आणतात. त्यांच्या बुद्धीने महाविकास आघाडीचे कामकाज सुरू आहे. आमचा जिल्हाधिकाऱ्यांवर विश्‍वास आहे. ते योग्य निर्णय देतील. 
- आशिष खातू, नगरसेवक भाजप 

वाढीव कामांचा प्रस्ताव आघाडीचाच 
निविदा प्रक्रियेला सामोरे जाऊन शहरातील जी विकासकामे ठेकेदारांनी घेतली आहेत त्यांच्याकडून वाढीव कामे करून घेण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनीच मांडला होता. सकपाळ वगळता सर्व नगरसेवकांच्या प्रभागात वाढीव कामे झाली. नगरसेवकांनी ती करून घेतली. आता त्यांच्याकडून विरोध सुरू आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight And A Half Crore Chiplun Palika Works In Technical Difficulty