आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून रणनीतीवर होतंय काम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

या बैठकीत आगामी निवडणुका लढण्यासाठी रणनीती आखली गेल्याची माहिती पुढे 
आली आहे. 

कणकवली (सिंधुदुर्ग) : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये सांघिक यश मिळविण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार असली तरी जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुका लढण्यासाठी रणनीती आखली गेल्याची माहिती पुढे 
आली आहे. 

कोरोना संकट कमी होत असल्याने आगामी काळात जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. जिह्यातील ७० ग्रामपंचायतींची मुदत संपली असून, तेथे प्रशासक नेमण्यात आले आहेत; तर ४६८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे.

हेही वाचा - शिवसेनेने मारली बाजी ; राष्ट्रवादीचाही धडाका, महाआघाडीत एकी नसल्याचे चित्र -

सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे; मात्र जिल्ह्यातील शिवसेना वगळता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित आहे. शिवसेना राज्यस्तरापासून ग्रामपंचायतस्तरावर सत्तेत सहभागी आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे फारशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद उरलेली नाही.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत बदल केले. नवे चेहरे न देता जुन्या चेहऱ्यांना मलमपट्टी लावली गेली. या दोन्ही पक्षांच्या पुरक संघटना फारशा सक्रीय दिसत नाहीत. तरीही शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाटा मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहतील; मात्र शिवसेना पदाधिकारी किंवा ग्रामीण भागातील कार्यकर्ते कितपत जुळवून घेणार यावर पुढील राजकारण्याची दिशा ठरणार आहे.

रणनीतीची शक्‍यता

आगामी काळात सहकारी संस्थांबरोबर ७० ग्रामपंचायती तसेच दोडामार्ग, वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने कंबर कसली असून मुंबईत महत्त्वपूर्ण बैठकीत प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीचा तपशील समजू शकला नसला तरी आगामी निवडणूकांची रणनीती आखली असावी, अशी शक्‍यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - Success Story: 20 गुठ्यांत काढला तब्बल 63 टन ऊस -

भाजप सध्या ‘एकला चलो रे’...

जिल्ह्यात सध्या स्थिती ‘एकला चलो रे’ अशी आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्यावर भाजपची ताकद अपेक्षेपेक्षा वाढली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील विजयानंतर आता राणे समर्थक आणि मूळ भाजप यांच्यातील राजकीय ताकद पुढच्या कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुकांवर अवलंबून राहणार आहे. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election atmosphere in sindhudurg shiv sena strategies in konkan sindhudurg