कुणकेरीतील वीजप्रश्न बेदखल

कुणकेरीतील वीजप्रश्न बेदखल

87485

कुणकेरीतील वीजप्रश्न बेदखल
सरपंचांचा आरोपः महावितरणच्या कारभारावर बैठकीत टीका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ः कुणकेरी गावातील वीज समस्यांबाबत तक्रार करूनही महावितरणकडून कोणतीच दखल घेतली नाही, अशी खंत सरपंच श्रीमती सोनिया सावंत यांनी व्यक्त केली. कुणकेरी ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी (ता. २) आयोजित बैठकीत त्यांनी हा आरोप करीत महावितरणच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली. यावेळी गावात उद्भवणाऱ्या विजेसंबंधित अनेक समस्यांवर चर्चा करून वीज ग्राहक संघटनेकडून ग्राहकांमध्ये ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली.
या बैठकीला वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर, उपसरपंच सुनील परब आदी उपस्थित होते. गावातील मुख्य चौकातील ट्रान्सफॉर्मरवर वेलींचे साम्राज्य असून, अनेक ठिकाणी विद्युत खांब वेली आणि झाडांनी वेढलेले आहेत. झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर आडव्या लटकत आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात झाडे पडून वीजपुरवठा दीर्घ काळ खंडित होण्याची शक्यता असल्याने गावातील लघु उद्योग, गणपती शाळा आदींची कामे रखडून नुकसान होण्याची भीती उपसरपंच सुनील परब यांनी व्यक्त केली. सरपंच सावंत यांनी गावात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने महावितरण कार्यालयात निवेदन देऊनही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याची खंत व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते मनोज घाटकर यांनी देखील मॉन्सूनपूर्व झाडे साफसफाई करण्यासंबंधी अर्ज देऊन उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करून देखील केवळ आश्वासने दिली जातात, परंतु काम करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
कुणकेरी गावासाठी दिलेला कंत्राटी वायरमन हा निरवडे, आरोस परिसरातील असल्याने गावात विजेची समस्या निर्माण झाल्यावर गावाला कोणीच वाली उरत नाही. त्यामुळे गाव बऱ्याचदा अंधारात असतो. गावासाठी नेमणूक दिलेला वायरमन, सहायक अभियंता मोरे हे कधीच फोन स्वीकारत नसल्याची तक्रार अनेक वीज ग्राहकांनी केली. त्याचबरोबर गावासाठी दिलेला वायरमन हा गावापासून २५-३० किलोमीटर लांब राहत असल्याने गावासाठी जवळ राहणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com