कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण; मार्च 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

रोहा - वीर विभागातील 46 किलोमीटर लांबीचे दुपदरीकरण प्रगतीपथावर असून मार्च 2020 मध्ये ते पूर्ण होईल. तसेच दहा नवीन स्थानकांची तर आठ लूप लाईनची कामे प्रगतीपथावर आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी 1100 कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

रत्नागिरी - रोहा - वीर विभागातील 46 किलोमीटर लांबीचे दुपदरीकरण प्रगतीपथावर असून मार्च 2020 मध्ये ते पूर्ण होईल. तसेच दहा नवीन स्थानकांची तर आठ लूप लाईनची कामे प्रगतीपथावर आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी 1100 कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

कोकण रेल्वेने 29 वा स्थापना 15 ऑक्‍टोबरला साजरा केला. त्यानिमित्ताने कोकण रेल्वे प्रशासनाने आढावा सादर केला. भारताशी कोकण जोडण्यासाठीचा सर्वात आव्हानात्मक प्रकल्प उभारण्यात आला. गोव्यात एमपीएलएडी योजनेंतर्गत 11.80 कोटीची कामे केली.

पर्यटन विकासांतर्गत मडगाव, करमाळी आणि थिव्हीम या स्थानकांसाठी दोन कोटी मंजूर आहेत. कोकणकन्या, मांडवी एक्‍सप्रेसचे एलएचबी कोचमध्ये रुपांतर झाले. सर्व स्थानकांवर मोफत वायफाय सेवा, वॉटर वेंडिंग मशीन आणि संगणकीकृत तिकीट प्रणाली अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस) सुरु केली. 

इंदापूर, गोरेगाव रोड, सपे वामणे, कळंबणी, कडवई, वेरावली, खारेपाटण, आचिर्णे या 10 नवीन स्थानकांची काम सुरू आहेत. आठ लूप लाईन प्रगतीपथावर असून मार्च 2020 पर्यंत ती पूर्ण होतील. त्यापैकी अंजनी, सावर्दा, राजापूर रोड, वैभववाडी रोड आणि मुर्डेश्‍वर स्थानकातील पाच अतिरिक्त लूप लाईन सुरू आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण प्रगतीपथावर असून ते मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल. कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने आतापर्यंत 85 मुले स्थानकांमधून वाचवण्यात आली आहेत. 2257 गुन्हेगारांना 12,222 रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच 25 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. 

नेपाळमध्ये कोकण रेल्वेचा धडाका 
कोकण रेल्वे अभियांत्रिकीत तज्ज्ञ म्हणून ओळखली जाते. कोकण रेल्वेने बिहार राज्यात रक्‍सौल आणि नेपाळची राजधानी काठमांडू येथे नव्याने प्रस्तावित रेल्वेमार्गाचे अभियांत्रिकी सर्वेक्षण केले. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाने डेमूच्या तरतुदीसाठी नेपाळ रेल्वेबरोबर सामंजस्य करारही केला. हे डेमु जानेवारी 2020 पर्यंत नेपाळला देण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेने विकसित केलेली नावीन्यपूर्ण स्वयंचलित ट्रेन परीक्षा प्रणाली (एटीईएस) भारतीय रेल्वेच्या विविध विभागांवर स्थापित केली आहे. श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. मागील वर्षात 10.26 कि.मी. बोगद्याचे उत्खनन पूर्ण झाले. 

102 कोटीचा निव्वळ नफा 
कोकण रेल्वेला 2018-19 या आर्थिक वर्षात 102 कोटीचा निव्वळ नफा मिळाला असून कंपनीची उलाढाल 2,898 कोटीवर पोचली आहे. त्यात प्रकल्पाची उलाढाल 1,611 कोटी तर ऑपरेटिंग टर्नओव्हर 1,264 कोटी आहे. कोकण रेल्वेने गेल्या पाच वर्षात 85.35 कोटी रुपये प्रवासी सुविधांवर खर्च केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electrification of Konkan Railway Purpose to be completed by March 2021