दोडामार्गः हुसकावण्यासाठी गेलेल्या युवकांवर टस्कराचा हल्ला

अनंत पाताडे
रविवार, 9 जून 2019

दोडामार्ग - मोर्ले येथे शनिवारी रात्री आठच्या सुमारास काजूच्या बागेत टस्कर घुसला होता. त्याला हुसकवण्यासाठी गेलेल्या युवकांवर टस्कराने हल्ला केला. हल्ल्यानंतर युवकांनी पळ काढला. टस्कराचा वावर या परिसरात आहे पण वनखात्याने याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. 

या घटनेनंतर टस्कर सुमारे तासाभराने नंदकिशोर येर्लेकर यांच्या घराजवळ दिसून आला.  ग्रामस्थांनी हल्ल्याच्या भीतीने  रात्र जागून काढली.

मोर्ले गावात टस्कराची दहशत पसरली आहे. तुषार देसाई यांच्या काजूच्या बागेत टस्कर आल्याचा सुगावा लागल्यावर काही युवक टस्कराला पिटाळून लावण्यासाठी तेथे गेले. बॅटरीच्या उजेडात टस्कराला समोर बघून युवक गडबडले. त्याच दरम्यान टस्कर युवकांवर धावून आला. घाबरलेल्या युवकांनी प्रसंगावधान राखत तेथून पळ काढला. 

त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नंदकिशोर येर्लेकर यांच्या घराजवळच टस्कर दिसला. येर्लेकर यांच्या घराजवळ बांबूचे बेट व फणसाची झाडे आहेत. फणसाच्या वासाने आकर्षित होऊन टस्कर  तिथे आला असावा असा अंदाज आहे. घराच्या बाहेरील बाजूस भांडी धुवत असलेल्या येर्लेकर यांच्या मुलीला हा टस्कर दिसला. तिने ही गोष्ट आई-वडील व शेजार्‍यांच्या कानावर घातली. काही धाडसी युवक व ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. बॅटरीच्या उजेडात त्यांना टस्कर दिसून आला. टस्कर केवळ वीस ते पंचवीस मीटर अंतरावर होता. ग्रामस्थांनी हाकारल्याने तो लगतच्या दाट झाडीत शिरला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elephant seen in Morle Dodamarg Taluka

टॅग्स