टस्कराच्या चित्काराने कुटुंबाची धावाधाव... घडले कुठे वाचा........

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

सगळ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर टस्कर माघारी फिरला.

साटेली-भेडशी (जि. सिंधुदुर्ग) : तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ सुरूच आहे. हेवाळे-खरारीब्रिज येथील वामनराव विठ्ठल देसाई व उल्हास माणिकराव देसाई यांच्या घराच्या मागच्या बाजूला रविवारी (ता.5) रात्री नऊच्या दरम्यान हत्ती पोहोचला. तेथे भांडी घासणाऱ्या ऊर्मिला उल्हास देसाई यांना तो दिसला आणि पळापळ झाली. त्यांनी लाईट लावली आणि टस्कराच्या चित्काराने सगळा परिसर दणाणून गेला. त्यांच्या दोन सुना, एक नात आणि पती उल्हास देसाई यांची भीतीने गाळण उडाली. अखेर आजूबाजूच्या गावकऱ्यांनी मिळून त्याला पिटाळले; पण देसाई कुटुंबाने मात्र अख्खी रात्र त्याच्या दहशतीत घालवली. त्याने आजूबाजूच्या शेती बागायतीचे नुकसानही केले. 

केर भेकुर्ली, मोर्ले, घाटिवडे, बांबर्डे परिसरात टस्कराचा वावर आहे. अगदी दिवसाढवळ्याही या परिसरात टस्कराचा मुक्त संचार अनेकांनी पाहिला आहे. हेवाळे येथील उल्हास माणिकराव देसाई व वामनराव देसाई यांची घरे लगतच आहेत. रविवारी (ता.5) रात्री नऊच्या दरम्यान ऊर्मिला देसाई मागच्या बाजूला भांडी घासण्यासाठी गेल्या असता त्यांना अचानक अंगणात आवाज येऊ लागला. त्यांनी लाईट लावत दरवाजा उघडून पाहिले असता अवघ्या पाच फूटांवर टस्कर उभा असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर टस्कराने चित्कार केला आणि तो थोडा पुढे सरकला. 

दरम्यान, आरडाओरडा झाल्याने आजूबाजूचे कुटुंबीय घराबाहेर आलेत. सगळ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर टस्कर माघारी फिरला. दैव बलवत्तर म्हणून दोन्ही कुटुंबीय टस्कराच्या हल्ल्यातून बचावले. 

सोमवारी सकाळी घरालगतच्या शेतात टस्कराच्या पायाचे भलेमोठे ठसे आढळले. माघारी परतताना टस्कराने लगतच्या शेतीचे व झाडांची नासधूस केली. श्री. देसाई यांच्या मागच्या दारी उसाचे छोटे बेट आहे. त्याची नासधूस त्याने केली. त्या उसासाठी तो घरापर्यंत पोचला असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

हे पण वाचा -अबब! चक्रीवादळांमुळे राज्यातील मत्स्योत्पादन किती टक्क्यांनी घटले...

बॅटऱ्या कधी मिळणार? 
दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना रोख रकमेऐवजी हत्तीबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना बॅटऱ्या देण्याची सूचना केली होती. केर येथील 20 जूनच्या बैठकीत श्री. सामंत यांनी शेतकऱ्यांना बॅटऱ्या न दिल्याबद्दल श्री. चव्हाण यांना धारेवर धरले होते, तरीही अद्याप शेतकऱ्यांना बॅटऱ्या मिळालेल्या नाहीत. रात्री अपरात्री हत्ती घराजवळ येत असल्याने तातडीने बॅटऱ्या देण्याची मागणी ऊर्मिला देसाई आणि स्वप्नील देसाई यांनी केली आहे. 

हे पण वाचा - लाचेची रक्कम घेऊन गेला स्वच्छतागृहात; बाहेर येताच अडकला जाळ्यात
टस्कराने तरवा तुडवला 
भातशेती लावणीसाठी आवश्‍यक तरवा (भातरोपे) शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उगवून काढला आहे. टस्कराने त्यातून ये-जा केल्याने त्याच्या पावलांनी तो तरवा चिरडून गेला असल्याने तो लावणीयोग्य उरलेला नाही. त्यामुळे भात लावणी पूर्ण कशी करायची हाही प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. 

हे पण वाचा - बातमीचा परिणाम - कोकणातील तिवरे धरणावर होणार आरसीसी भिंत ; विनायक राऊत

"गावात आलेल्या टस्कराला आम्ही बराच वेळ हाकलत होतो; पण तो माघार घ्यायला तयार नव्हता. गावात सातत्याने लाईट जाते शिवाय वनविभागाने अद्याप शेतकऱ्यांना बॅटरी पुरवलेल्या नाहीत. त्या तातडीने पुरवाव्यात. शिवाय हत्तींना हाकलण्यासाठी आवश्‍यक साहित्य द्यावे आणि लवकरात लवकर हत्ती पकड मोहीम राबवावी. सरकारने मनुष्यहानी होण्याची वाट पाहू नये.'' 
- स्वप्नील देसाई, युवा शेतकरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elephant's screams make family panicked