रत्नागिरीत १० धरणांसाठी आता 'इमर्जन्सी ऍक्‍शन प्लॅन'

राजेश शेळके
Sunday, 15 November 2020

सुमारे 30 लाखांचा हा आराखडा आहे. यामुळे मोठी जीवितहानी आणि नुकसान टळणार आहे.

रत्नागिरी : चिपळूण तिवरे तालुक्यातील धरण फुटल्यानंतर पाटबंधारे विभागाने ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात अशा घटनेतून मोठी जीवितहानी आणि नुकसान टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने 10 धरणांचा 'इमर्जन्सी ऍक्‍शन प्लॅन' तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

धरण फुटल्यास कोणत्या पातळीने पाणी जाईल, किती भाग पाण्याच्या घेऱ्यात येणार, किती घरे, गावे, बाधित होतील, किती लोकांचे स्थलांतर करावे लागणार, किती नुकसान होणार आदींचा अभ्यास या आपत्कालीन प्लॅनमध्ये केला जाणार आहे. पाटबंधारे विभागाच्या इमर्जन्सी प्लॅनमध्ये जिल्ह्यातील 10 धरणांचा समावेश आहे. हा आराखडा तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा -  ऐन दिवाळीत त्यांच्यावर काळाने घातला घाला ; दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू -

सुमारे 30 लाखांचा हा आराखडा आहे. यामुळे मोठी जीवितहानी आणि नुकसान टळणार आहे. तिवरे धरण फुटल्यानंतर त्या पाण्याच्या लोंढ्यामध्ये अनेक घरे, जनावरे वाहून गेली. 23 जणांचा मृत्यू झाला होता. अनेक घरं, संसार उद्‌ध्वस्त झाले. त्यांच्या पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; मात्र याची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी पाटबंधारे विभागाने घेतली आहे. ज्या धरणांच्या पायथ्याशी मानवी वस्ती आहे, अशा धरणांचा अभ्यास पाटबंधारे विभाग करीत आहे. जिल्ह्यातील मोरवणे, पिंपळवाडी, पन्हाळे आदी 10 धरणांचा अभ्यास केला जाणार आहे. आपत्कालीन प्लॅनची एक प्रत जिल्हा प्रशासन आणि त्या-त्या तहसीलदारांना देण्यात येणार आहे. 

"जिल्ह्यातील 10 धरणांचा 'इमर्जन्सी ऍक्‍शन प्लॅन' तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. तिवरे दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्यास मोठी जीवितहानी आणि नुकसान टाळण्यासाठी हा आपत्कालीन प्लॅन तयार केला जात आहे."

 - जगदीश पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग (दुरुस्ती) 

हेही वाचा - शेतकऱ्यांना दिलासा ; एकाच दिवसात दहा टन झेंडुच्या फुलांची विक्री -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: emergency action plan for dam in critical situation in ratnagiri 10 dams are included this project