'लाल आणि काळा भाताच्या जातीला यापुढे मिळणार प्रोत्साहन'....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

कृषिमंत्री दादाजी भुसे ; नवनवीन संशोधन शेतकर्‍यांपर्यंत पोचविणार...

 

दाभोळ (रत्नागिरी)  :  भात पिकाखालील क्षेत्र आणि भाताची उत्पादकता अजून कशी वाढली जाईल याकडे आपण प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. लाल आणि काळा भात या सारख्या भाताच्या जातींना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे हे वर्ष ‘उत्पादकता वाढ’ वर्ष म्हणून साजरे करण्याचे योजले आहे. 

भातातील नवनवीन संशोधन शास्त्रज्ञांमार्फत करून शेतकर्‍यांपर्यंत पोचविण्याचे कार्य केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागातर्फे ऑनलाइन पद्धतीने झूम मीटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून राज्यस्तरीय भातपिक परिसंवाद झाला. यामध्ये राज्याचे कृषिमंत्री  भुसे सहभागी झाले होते. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून उपस्थित असणार्‍या शेतकर्‍यांशी संवाद साधला.

दापोलीत राज्यस्तरीय भातपीक परिसंवाद
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना  भुसे म्हणाले, शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांचा वापर करून सामान्य शेतकर्‍यांनी सध्या गटशेतीमार्फत चांगला विकास साधला आहे. शासनामार्फत राबविल्या जाणार्‍या कृषीविषयक योजना शेतकर्‍यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील.

हेही वाचा- कोल्हापुरात कोरोना मीटर थांबेना ; आणखी 20 जण कोरोना पाॅझिटिव्ह.... -

कुलगुरू डॉ. संजय सावंत म्हणाले, कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर पडणार्‍या पावसामुळे भातपिक हे चांगल्या प्रमाणामध्ये घेतले जाते. विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित जातींचा विचार करता त्यापासून 35 ते 40 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. काही जाती अशाही आहेत की ज्या 45 ते 50 क्विंटलपर्यंत उत्पन्न देतात. अशा जातींचे बियाणे शेतकर्‍यांपर्यंत पोचविण्यासाठी आणि त्यांच्या बीजोत्पादनासाठी प्रयत्न केले जात आहेत.

विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, डॉ. महेंद्र कुमार, विकास पाटील, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, डॉ. व्ही. एस. शिर्के यांनी भात पिकांवरील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. भातपिकाचे शेतकरी, विस्तार कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ अ‍ॅपद्वारे मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. तांत्रिक सत्रामध्ये शेतकर्‍यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना चारही कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली. हा परिसंवाद यु टयूब आणि फेसबुकच्या साहाय्याने थेट प्रक्षेपित करण्यात आला.

हेही वाचा- सुनेने गळफास घेतल्याचे सांगितले पण माहेच्यांनी केला वेगळाच आरोप ; बेळगावात खळबळ... -

कोकण कृषी विद्यापीठाने स्थापनेपासून 35 भाताच्या जाती विकसित केल्या आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या गुणधर्माच्या जातींचा समावेश होतो. सध्या अजून मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. तरी लवकरच नवीन अजून चांगल्या प्रकारच्या जाती पुढे येतील.
--डॉ. संजय सावंत, कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encourage black and red rice varieties in ratnagir