esakal | गोव्यात नोकरीला जाणाऱ्यांचा ई-पासचा प्रश्न निकालात

बोलून बातमी शोधा

गोव्यात नोकरीला जाणाऱ्यांचा ई-पासचा प्रश्न निकालात
गोव्यात नोकरीला जाणाऱ्यांचा ई-पासचा प्रश्न निकालात
sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात दररोज नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या तरुणांना जिल्हा प्रवेश बंदीतून सवलत द्यावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन केली. त्यावेळी झालेल्या चर्चेत या तरुणांना १५ दिवसांचा पास देण्याचे आश्वासन दाभाडे यांनी दिल्याची माहिती राजन तेली यांनी 'सकाळ' दिली. यामुळे जिल्ह्यातून गोव्यात नोकरीला जाणाऱ्या १४ हजार तरुण-तरुणींचा प्रश्न निकाली निघाला आहे.

राज्य शासनाने गोव्यातून येणाऱ्यांना ई-पास अत्यावश्यक केल्याने या आदेशाची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने आजपासून केली. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर तात्काळ गोव्यातून येणाऱ्यांची रॅपिड तपासणी व ई-पासची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका नोकरदार तरुणांना बसला. याबाबतची कल्पना बांदा सरपंच अक्रम खान यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना दिली. तेली यांनी याचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक दाभाडे यांची भेट घेत परिस्थितीची कल्पना दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत दाभाडे यांनी नोकरदार युवकांना जिल्हा प्रशासनाकडून पंधरा दिवस ये-जा करण्यासाठी पास देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे सावंतवाडी व बांदा परिसरातील युवकांनी बांदा सरपंच अक्रम खान, वेंगुर्ले तालुक्यातील तसेच सातार्डे परिसरातील युवकांनी भाजपचे तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर यांचेकडे व दोडामार्ग तालुक्यातील युवकांनी माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व चेतन चव्हाण यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर नाव नोंदणी करण्याचे आवाहन राजन तेली यांनी केले आहे. या युवक-युवतीची नावे जिल्हा प्रशासनाला भाजपच्या वतीने कळविण्यात येणार असून त्यांच्या नावे पास जारी करण्यात येणार असल्याचे तेली यांनी सांगितले आहे.