लाटांच्या तडाख्याने या किनारपट्टीची धूप 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

गेल्या दोन दिवसापासून पावसाने किनारपट्टीला चांगलेच झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस कोसळत आहे. पावसाच्या दमदार सरींमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला दिसत आहे.

देवगड ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलाच जोर धरला आहे. उधाणाच्या भरतीमुळे समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. तालुक्‍यातील तांबळडेग येथील किनाऱ्याला समुद्राच्या लाटांचा तडाखा बसत असून किनारपट्टीची धूप होत आहे. किनाऱ्यालगतची झाडे समुद्राच्या लाटांमुळे उन्मळून पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. गेल्या चोवीस तासात आज सकाळपर्यंत येथे 84 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. 

गेल्या दोन दिवसापासून पावसाने किनारपट्टीला चांगलेच झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस कोसळत आहे. पावसाच्या दमदार सरींमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला दिसत आहे. समुद्राची गाज वाढली आहे. उधाणाच्या लाटांचा किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा बसत आहे. तालुक्‍यातील तांबळडेग किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांचा मारा सुरू आहे.

वाळूच्या किनाऱ्यावर लाटा धडकत आहेत. त्यामुळे किनाऱ्याची धूप होऊ नये म्हणून किनारपट्टीला लावलेली सुरूची झाडे उन्मळून पडत आहेत. काही झाडे समुद्राच्या पाण्यात पडली आहेत. या भागात किनाऱ्यावरून रस्ता असून जवळच लोकवस्ती आहे. त्यामुळे समुद्राच्या लाटांचा तडाखा असाच कायम राहिल्यास धोका उद्‌भवण्याच्या शक्‍यतेने नागरिकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. किनारपट्टी भागात संरक्षक भिंत असावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. 

रात्रीपासून पावसाने तालुक्‍याला चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या चोवीस तासात आज सकाळपर्यंत येथे 84 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत 2500 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस तालुक्‍यात झाला आहे. गेल्या दोन दिवसात कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाले यांना पूर आला आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Erosion Of Devgad Tambaldeg Coastal Area Due To Heavy Waves Hits