रत्नागिरीत एस. टी. ला रोज नऊ लाखांचा तोटा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाउन घोषित केला होता. त्यामुळे एसटी सेवादेखील बंद पडली. मार्चपासून ही सेवा बंद झाली. जूनपासून एसटी सेवेला सुरवात करण्यात आली. प्रथम जिल्हाअंतर्गत नंतर तालुकाअंतर्गत फेऱ्या सुरू करून 22 प्रवासी क्षमता ठेवली होती.

चिपळूण ( रत्नागिरी ) - एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली तरी प्रवाशांकडून अद्याप तरी एसटी सेवेला प्राधान्य मिळताना दिसत नाही. भारमान कमी असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात एसटी महामंडळाला लाखों रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यामध्ये ग्रामीण सेवेसाठी सुमारे साडेसात लाख, तर शहरी सेवेसाठी दीड लाख रुपये नुकसान सोसावे लागत आहे. चिपळूण आगारातील सुमारे 70 टक्के एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, दिवसाकाठी सुमारे साडेचार ते पाच लाखाचे उत्पन्न मिळते आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाउन घोषित केला होता. त्यामुळे एसटी सेवादेखील बंद पडली. मार्चपासून ही सेवा बंद झाली. जूनपासून एसटी सेवेला सुरवात करण्यात आली. प्रथम जिल्हाअंतर्गत नंतर तालुकाअंतर्गत फेऱ्या सुरू करून 22 प्रवासी क्षमता ठेवली होती. नंतर हळूहळू ग्रामीण भागातील गावागावात एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या, तर 18 सप्टेंबरपासून पूर्णतः सूट देऊन पूर्ण क्षमतेने एसटी सेवा सुरू करण्यात आली.

सद्यःस्थितीला एसटीच्या 400 बसेसमधून 1450 फेऱ्या सुरू असून दिवसाला 59 हजार प्रवाशी एसटीतून प्रवास करत आहेत, तर शहरी वाहतूकदेखील 21 सप्टेंबरपासून सुरू केली आहे. परंतु प्रवाशांचा अल्प प्रतिसाद पाहता 250 पैकी 210 फेऱ्या सुरू करण्यात आले असून, दिवसाला सुमारे 1800 ते 1900 प्रवाशी प्रवास करत आहेत. शाळा अद्याप बंद असल्याने शालेय फेऱ्यादेखील अद्याप बंदच आहेत. 

पूर्ण क्षमतेने एसटी सेवा सुरू झाली असली तरी प्रवाशांचा प्रतिसाद अद्यापपर्यंत एसटीला मिळालेला नाही. कमी भारमानामुळे रत्नागिरी विभागाला दररोज तब्बल 9 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. एसटीला मिळणारे उत्पन्न त्यातून इंधन, देखभाल, दुरुस्ती असे विविध खर्च वगळता दररोज ग्रामीण सेवेपोटी साडेसात लाख तर शहरी सेवेपोटी दीड लाख इतका तोटा रत्नागिरी विभागाला दररोज सोसावा लागतो. कोरोनामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याचे चित्र आहे. 

चिपळूण आगारात लॉकडाउनपूर्वी दररोज सुमारे साडेआठ ते नऊ लाखाचे उप्तन्न मिळत होते. त्यापैकी आता केवळ 60 टक्केच उत्पन्न मिळते आहे. या आगारातील 70 टक्के फेऱ्या सुरू झाल्या आहेत. 
- रणजित राजेशिर्के, आगारप्रमुख चिपळूण 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Every Day Nine Lakh Loss To ST In Ratnagiri Marathi News