रामदास कदम म्हणाले, `हा`प्रस्ताव कोकणावर अन्याय करणारा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

कोयना प्रकल्पातून जलविद्युत निर्मितीनंतर वाशिष्ठी नदीत समुद्रसपाटीपासून 4 मीटर तलांकावर कृष्णा खोऱ्यातील कोयना नदीचे पाणी सोडण्यात येते.

खेड ( रत्नागिरी ) - कोयना अवजलाचा वापर कोकणसाठीच करावा, अशी मागणी शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कदम यांनी राज्यपाल महोदयांची राजभवनात भेट घेतली व निवेदन दिले. 

कोयना प्रकल्पातून जलविद्युत निर्मितीनंतर वाशिष्ठी नदीत समुद्रसपाटीपासून 4 मीटर तलांकावर कृष्णा खोऱ्यातील कोयना नदीचे पाणी सोडण्यात येते. त्यापैकी बहुतांश पाणी समुद्रात वाहून जाते. पश्‍चिम वाहिनी नदी खोऱ्याच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यास 22 जून 2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य जल परिषदेच्या पाचव्या बैठकीत मान्यता दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या 1 नोव्हेंबर 2018च्या बैठकीत कोयना अवजल प्रकल्पाबाबत चर्चा झाली. या बैठकीत कोयना अवजल राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार करण्याबाबत तसेच सविस्तर अभ्यास करण्याच्या कमी वाप्कोस या केंद्रशासन अंगीकृत अभिकरणास सूचना तातडीने देण्याबाबत निर्देश दिले होते. 

या बैठकीत माजी मंत्री रामदास कदम यांनी या योजनेच्या सद्यःस्थितीबाबत विचारणा केली होती. त्यामध्ये त्यांना कोयना अवजल योजनेच्या पूर्व प्राथमिक सविस्तर प्रकल्प अहवाल वाप्कोसचा केंद्रशासन अंगीकृत अभिकरणाकडून करून घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. 

कोकणावर अन्याय करणारा प्रस्ताव 
योजनेमध्ये कोळकेवाडी धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यापैकी काही पाणी उत्तरेकडे कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास खोऱ्यात तर उर्वरित 17.5 अ. घ. फू. पाणी दक्षिणेकडे शास्त्री, मुचकुंदी, कोदवली खोऱ्यात सिंचन किंवा बिगर सिंचन वापरासाठी वळविणे प्रस्तावित आहे. ही बाब अतिशय गंभीर असून 50 टी. एम. सी. पाणी कोकणच्याबाहेर 7.50 टी. एम. सी. पाणी नाणार प्रकल्पासाठी प्रस्तावित केले असून, 67 टी. एम. सी. पाण्यापैकी फक्त 10 टी. एम. सी. पाणी कोकणसाठी आहे, अशी माहिती देण्यात आली. या प्रस्तावाचा आपण निषेध करीत असून हा प्रस्ताव कोकणावर अन्याय करणारा आहे, असे कदम यांनी राज्यपाल यांना निवेदन देऊन कळवले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex Minister Ramdas Kadam Comment On Proposal Of Koyan Water