माजी कुलगुरू डॉ. प्रतापराव साळवी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ex Vice Chancellor Dr Prataprao Salvi No More

डॉ. साळवी यांचा जन्म रत्नागिरी तालुक्‍यातील फणसोप गावी 1 जून 1931 रोजी झाला. पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून बी. एस्सी (कृषी) पदवी प्राप्त केल्यावर ते कृषी विभागाच्या सेवेत रुजू झाले.

माजी कुलगुरू डॉ. प्रतापराव साळवी यांचे निधन

दापोली  : रत्नागिरीचे सुपुत्र, कोकण कृषी विद्यापीठाच्या पायाभरणीचे एक शिल्पकार आणि कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रतापराव साळवी यांचे काल (ता. 17) सकाळी 8 वाजता पुणे येथे निधन झाले. गेले आठ दिवस ते इस्पितळात उपचार घेत होते. ते 89 वर्षांचे होते. उत्कृष्ट प्राध्यापक, प्रशासक आणि नियोजक असा त्यांचा लौकिक होता. 

डॉ. साळवी यांचा जन्म रत्नागिरी तालुक्‍यातील फणसोप गावी 1 जून 1931 रोजी झाला. पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून बी. एस्सी (कृषी) पदवी प्राप्त केल्यावर ते कृषी विभागाच्या सेवेत रुजू झाले. सेवेत असतानाच त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एम. एस. आणि पी. एच. डी. पदव्या संपादन केल्या. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात कृषी विस्तार विभागाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी 15 वर्षे सेवा केली. त्यानंतर त्यांनी 4 डिसेंबर 1971 ते 30 एप्रिल 1975 ही 4 वर्षे दापोलीच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविले.

कोकण कृषी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर येथे त्यांनी कृषी विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून काम केले. 26 ऑक्‍टोबर 1977 ते 9 डिसेंबर 1987 या कालावधीत ते विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यानंतर परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी 4 वर्षे काम केले. डॉ. साळवी हे उत्कृष्ट प्राध्यापक होते. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विस्तार विषयात पदव्युत्तर व डॉक्‍टरेट शिक्षण घेतले.

अनंत अडचणींचा सामना करत त्यांनी कोकण कृषी विद्यापीठाची पायाभरणी केली. वाकवली येथे मध्यवर्ती संशोधन केंद्राची उभारणी हे त्यांचे अतुलनीय कार्य. त्यांच्याच कारकिर्दीत रत्नागिरीला मत्स्य महाविद्यालय (1981) आणि दापोली येथे बी. एस्सी. (वनशास्त्र) आणि बी. एस्सी. (उद्यानविद्या) अभ्यासक्रम सुरू झाले. कृषी विद्याशाखा आणि पशुवैद्यक विद्याशाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांनी सुरू केले. मुंबईच्या पशुवैद्यक महाविद्यालयासाठी गोरेगाव येथे 47 एकर जमीन मिळवून विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे.

विद्यापीठाला अनेक पुरस्कार

त्यांच्या काळात विद्यापीठाने केलेल्या कार्याची दखल घेत विद्यापीठाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यामध्ये पशुवैद्यक क्षेत्रातील संशोधनाबद्दल भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कार (1979), उत्कृष्ट उद्यानविद्या विषयक संशोधनासाठी डॉ. जे. जे. पटेल पुरस्कार (1981) आणि राज्य शासनाचा कृषीभूषण पुरस्कार (1988), वैभव विळ्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचा पारखे पुरस्कार (1984) यांचा समावेश आहे.