"माझी वसुंधरा'तून सिंधुदुर्गला वगळले

Excluded Sindhudurg district from my Vasundhara campaign
Excluded Sindhudurg district from my Vasundhara campaign

ओरोस (सिंधुदुर्ग) - पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या निसर्गाशी सबंधित पंचतत्वांसोबत मानवी जीवन पद्धती अंगीकारण्याची सवय लागावी यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने 2 ऑक्‍टोबर पासून राज्यात "माझी वसुंधरा' हे अभियान सुरु केले आहे. मात्र, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला डावलले आहे. केंद्र अथवा राज्य शासनाचे प्रत्येक अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्याने यशस्वी राबविले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा वारंवार शासनस्तरावर सन्मान झाला आहे. तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्याला वगळल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

"माझी वसुंधरा' हे अभियान राज्यातील 667 स्थानिक स्वराज्य संस्थेत राबविण्यात येत आहे. यामध्ये 43 महानगरपालिका, 226 नगरपालिका, 126 नगरपंचायती, 10 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 246 ग्रामपंचायतींचा आणि पाच हजार पेक्षा जास्त परंतु 10 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 26 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 2 ऑक्‍टोबर 2020 ते 31 मार्च 2021 एवढ्या कालावधीत हे अभियान राबणार आहे. कालावधी संपल्यानंतर 1500 गुणांचे मूल्यमापन त्रयस्त यंत्रणेमाफत करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तर एक या प्रमाणे नागरी स्वराज्य संस्थेस व ग्राम पंचायतचा बक्षीस देवून तर राज्य स्तरावर महानगर पालिका, नगर परिषदा, नगर पंचायती आणि ग्राम पंचायती प्रत्येकी तीन संस्थेला पुरस्कार देण्यात येणार आहे. 

निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्‍चित करण्यासाठी निसर्गाशी सबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय विभाग कार्य करीत असतात. पृथ्वी तत्वाशी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपिकरण इत्यादी बाबिंवर कार्य करणे. वायूचे संरक्षण करताना हवेच्या गुणवत्तेसाठी वायू प्रदूषण कमी करणे.

जल विभागात नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जल स्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण, सागरी किनारे स्वच्छ्ता ठेवणे. अग्नीसाठी ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा-पडीक जमीनी, शेतीचे बांध येथे अपारंपरिक ऊर्जा वापरसाठी प्रयत्न करणे. आकाश विभागात काम करताना स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्‍चित करून मानवी स्वभावातील बदलासाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे बिंबविणे हा प्रमुख उद्देश आहे. निसर्गाची ही पंचतत्वे अंगिकारल्या शिवाय आपण निसर्गासोबत जगू शकत नाही. तसेच जैवविविधतेचे अस्तित्व राहणार नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थासाठी "माझी वसुंधरा' हे अभियान राबविण्यात येत आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रत्येक अभियानात ठसा उमटविला आहे. निर्मल भारत अभियान, संपूर्ण स्वच्छ्ता अभियान, हागणदारी मुक्त अभियान, यशवंत पंचायत राज अभियान, पर्यारण पूरक अभियान, संत गाडगेबाबा नागरी व ग्रामीण स्वच्छ्ता अभियान या सर्व अभियानमध्ये जिल्ह्याने लक्षवेधी काम केलेले आहे. हागणदारी मुक्त अभियानात जिल्हा आशिया खंडात प्रथम होता. स्वच्छ जिल्हा स्पर्धेत पठारी भागात जिल्ह्याने प्रथम येण्याचा मान मिळविलेला आहे. तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 'माझी वसुंधरा' अभियानात समावेश नाही. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

...मग सिंधुदुर्ग का नाही? 
माझी वसुंधरा अभियान लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्याचा निर्णय घेतला. 10 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात हे अभियान राबविले जात आहे. आपल्या जिल्ह्यात एवढी लोकसंख्या नाही; परंतु एवढी लोकसंख्या नसल्याने रत्नागिरी, रायगड आणि गोंदिया या जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतीमध्ये 10 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत अभियान राबविण्यात येत आहे; पण 5 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15 ग्रामपंचायती आहेत. मग सिंधुदुर्ग जिल्ह्याचाच समावेश का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मोठ्या लोकसंख्येची गावे 
ग्रामपंचायत*2011 च्या जनगणनेनुसार 
बांदा*6611 
कोलगांव*6094 
तळवडे*5886 
माजगाव*5080 
उभादांडा*6838 
रेडी*5477 
शिरोडा*6329 
आरोस ब्रु*5311 
नेरूर देवूळवाडा*7030 
पिंगुळी*8316 
माणगाव*6725 
आचरा*5109 
मसुरे-डांगमोडे*5778 
फोंडाघाट*9036 
कलमठ*8011 
कासार्डे*5777 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com