सिंधुदुर्गवासीयांनो सावधान! आता प्रशासनाच्या `तिसऱ्या डोळ्या`ची नजर

विनोद दळवी 
Tuesday, 28 July 2020

कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, साटेली - भेडशी, बांदा, देवगड - जामसंडे, वैभववाडी, मालवण अशा शहातील एकूण 59 ठिकाणी कॅमेरे आहेत.

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा नियोजनमधून तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या निधितून जिल्ह्यातील महत्त्वाच्या सर्व रस्त्यांवर सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. 4 कोटी 98 लक्ष रुपये खर्चून जिल्ह्यातील 93 ठिकाणी 280 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या प्रणालीचे लोकार्पण उद्या (ता. 28) सायंकाळी 4 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांवर होणाऱ्या रहदारिवर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या विशेष प्रयत्नामुळे ही सुरक्षितता प्रत्यक्षात अमलात आली आहे. 

तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून 5 कोटी निधी मंजूर केला होता. यासाठी पोलिस अधीक्षक गेडाम यांनी पाठपुरावा केला होता. गेली अनेक वर्षे हे काम सुरू होते. आता हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील 93 ठिकाणी 280 कॅमेरे बसविले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर उपस्थित राहणार आहेत. 
कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, साटेली - भेडशी, बांदा, देवगड - जामसंडे, वैभववाडी, मालवण अशा शहातील एकूण 59 ठिकाणी कॅमेरे आहेत.

तर म्हापण, परुळे, पाट, आंबोली, मळगाव, वेताळ बांबर्डे, पणदूर, कसाल, आचरा, कुणकेश्‍वर, शिरगाव, नांदगाव, भूईबाडवा, पडेल या 18 ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील 6 रेल्वे स्टेशन, 3 जेटी, 7 तपासणी नाके हे ही आता सीसीटीव्हीच्या नजरेत आले आहेत. 
बसविलेल्या कॅमेऱ्यांपैकी 210 कॅमेरे हे 4 मेगापीक्‍सेल नाईटव्हीजन बुलेट प्रकारातील आहेत. तर 30 कॅमेरे हे 4 मेगापीक्‍सल रंगीत नाईटव्हीजन बुलेट कॅमेरे प्रकारातील आहेत. तर स्वयंचलित वाहन क्रमांक ओळखणारे नाईटव्हीजन कॅमेरे 40 आहेत.

या संपूर्ण प्रकल्पाची साठवण क्षमता सहाशे टेराबाईट्‌स असून 45 दिवसांपर्यंत साठवण करता येते. जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच पोलीस ठाणे पातळीवर लाईव्ह कॅमेराद्वारे देखरेख व प्लेबॅकची सुविधा. प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये अंतर्गत संचय सुविधा तसेच पॉवर बॅकअप आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष येथे 22 फूट रुंद हाय डेफिनेशन व्हीडिओ वॉल आणि व्हीडिओ व्यवस्थापन सर्व्हर, स्टोरेज सुविधेसह सुसज्ज आहे. सर्व सीसीटीव्ही हे सौर ऊर्जेवर चालणारे आहेत. तसेच सर्व यंत्रणा ही हायस्पीड फायबर ऑप्टिक्‍स नेटवर्कने जोडलेली आहे. 4 मेगापिक्‍सल कॅमेरे असल्यामुळे रस्त्यावरील सर्व हालचालींचे स्पष्ट चित्रण करणे शक्‍य होणार आहे. 

जिल्हाभरात लावलेल्या सीसीटीव्हींमुळे जिल्हा अधिक सुरक्षित झाला आहे. यामुळे पर्यटनवृद्धीस मदत होणार आहे. गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल. महिला व बालकांवरील अत्याचारांना आळा बसेल. रीमोट अनाउसिंगमुळे आपत्कालीन परिस्थितीत मनुष्य हानी टाळता येईल. वाहनांना शिस्त लागेल, हरवलेल्या वस्तू व व्यक्तींचा मागोवा घेणे सोपे होईल. 
- दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facility of CCTV cameras in Sindhudurg district