दोडामार्गात भाजपला गटबाजीचे ग्रहण 

प्रभाकर धुरी
Thursday, 15 October 2020

"सब आलबेल है', असे प्रसिद्धी माध्यमांसमोर भासवणाऱ्या भाजपच्या वरिष्ठांनी वादळापुर्वीची शांतता वेळीच ओळखायला हवी.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - गटातटाच्या राजकारणामुळे भाजपची ताकद तालुक्‍यात दुभंगत आहे. वरिष्ठांकडून सारे आलबेल असल्याचे भासवले जात असले तरी गटबाजीच्या विळख्यामुळे तालुक्‍यात भाजप कमकुवत बनली आहे. दोन-तीन वर्षांत दिसलेली भाजपची ताकद अलिकडच्या सहा-सात महिन्यांत अपवादानेही दिसत नाही. तालुक्‍यात काल झालेल्या भाजपच्या तालुकास्तरीय आंदोलनाला एका गटाची हजेरी आणि दुसऱ्या गटाची दांडी बरेच काही सांगून गेली. "सब आलबेल है', असे प्रसिद्धी माध्यमांसमोर भासवणाऱ्या भाजपच्या वरिष्ठांनी वादळापुर्वीची शांतता वेळीच ओळखायला हवी. 

शिवसेनेच्या साथीने आणि पाठिंब्याने वाढलेली भाजप काही वर्षांत स्वतंत्रपणे जोमाने वाढत होती. नाही म्हणायला भाजपमध्ये तेव्हाही गट-तट होतेच; पण त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचे काम तत्कालिन तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी केले. त्यांच्या काळात खऱ्या अर्थाने शिवसेनेसमोर सशक्त पर्याय म्हणून भाजप उभी राहिली.

भाजपमध्ये तालुकाध्यक्षाचा कार्यकाल दोन वर्षांचा असतो; पण दळवी यांना तीन वर्षांहून अधिक काळ देण्यात आला. त्यांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. ग्रामपंचायती, विधानसभा, लोकसभा निवडणुका त्यांच्या काळात झाल्या. त्यात भाजपला बऱ्यापैकी यश मिळाले. त्यांनी सगळ्यांना एकत्र करुन भाजपला यश मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली. त्याचे फळ म्हणून 28 ग्रामपंचायतीपैकी 12 ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच तर 16 उपसरपंच बसले आणि 60 हून अधिक सदस्य निवडून आले. 

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 6 हजार 500 मते मिळाली होती, तर 2019 मध्ये त्यांना 10 हजार 300 मते मिळाली. जवळपास 3 हजार 800 मतांची वाढ होण्यात दळवी यांची अचूक रणनीती आणि सहकाऱ्यांची साथ महत्वाची ठरली. तालुक्‍यात चार ठिकाणी व्हर्चुअल सभा घेवून त्या यशस्वी करणे भाजपला त्यांच्यामुळेच शक्‍य झाले. 

दरम्यान, स्वाभिमानचा एक गट भाजपमध्ये आला. त्यामुळे दळवी यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांना तालुकाध्यक्ष म्हणून पुढे आणले; पण तो तात्पुरता उपाय होता. त्यानंतर तालुकाध्यक्ष निवडीचा मुद्दा पुढे आला. तालुकाध्यक्षांच्या शर्यतीत श्री. नानचे, पंचायत समिती सदस्य बाळा नाईक यांची नावे चर्चेत आली. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांचे नावही काहींनी सुचवले.

त्यात राजेंद्र निंबाळकर, विलास सावंत, रमेश दळवी यांची नावे मागे राहिली. श्री नानचे, श्री. नाईक अथवा श्री नाडकर्णी यांच्या नावावर एकमत होईना. वेगवेगळ्या गटांनी वेगवेगळ्या नावांना पाठिंबा दिल्याने खुद्द रवींद्र चव्हाण यांनाही निर्णय घेणे अवघड बनले. त्यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर निर्णय सोपवण्याचे संकेत दिले; पण अचानक तालुका सचिव प्रवीण गवस यांना तालुकाध्यक्ष केले, तर प्रमोद कामत यांना प्रभारी. 

शहरात दोन गटतट 
श्री. गवस आणि बाळा नाईक एकेकाळचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांचे कट्टर समर्थक; पण आज त्यांच्यामधून विस्तवही जात नाही. मधल्या काळात श्री म्हापसेकर आणि श्री. आठलेकर, रंगनाथ गवस यांचे गटही वेगवेगळे होते. आता श्री. आठलेकर हे बाळा नाईक यांच्यासोबत तर श्री. म्हापसेकर, श्री. दळवी, श्री. नानचे, श्री. नाडकर्णी यांच्यासोबत आहेत. तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, बाळा नाईक, यशवंत आठलेकर, रंगनाथ गवस, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचा वेगळा गट आहे. शहरातील भाजपमध्ये श्री. नानचे आणि श्री. चव्हाण असे दोन गट आहेत. 

पक्षासाठी गटबाजी घातक 
बाळा नाईक यांनी नुकतेच चार दिवस उपोषण केले. त्याला माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर यांनी भेट दिली; पण तिथेही दुसऱ्या गटाची अनुपस्थिती दिसली. भाजपने सरकार विरोधात आंदोलन केले. प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनालाही दुसऱ्या गटाची अनुपस्थिती होती. एका बाजूला भाजपमधील एक गट आणि स्वाभिमानचे बहुतेक कार्यकर्ते एकत्र आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रवीण गवस, श्री. नाईक, श्री. चव्हाण, श्री. आठलेकर एकत्र आहेत. ही गटबाजी पक्षासाठी घातक आहे. तालुका प्रभारी प्रमोद कामत आणि जिल्हाध्यक्ष तेली यांनी याकडे गांभीर्याने पाहावे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Factionalism among BJP workers in Dodamarg taluka