पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना थाटामाटात निरोप 

विनोद दळवी 
Sunday, 20 September 2020

यावेळी त्यांची जीप मधून गेडाम यांची सहकुटुंब रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांच्या कुटुंबाची एकत्रित फोटो फ्रेम तयार करून त्यांना भेट देण्यात आली.

ओरोस (सिंधुदुर्ग) - पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची सांगली येथे बदली झाल्याने जिल्हा पोलिस दलाच्यावतीने काल (ता.18) त्यांना वेगळ्या थाटामाटात निरोप देण्यात आला. यावेळी गेडाम यांची सहकुटुंब रॅली काढत त्यांनी बजावलेल्या सेवेला मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर उपस्थित होते. 

दीक्षित गेडाम यांनी अमोघ गांवकर यांची बदली झाल्यानंतर 29 एप्रिल 2017 ला सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला होता. तब्बल साडेतीन वर्षे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी सांभाळली आहे. एवढी मोठी कारकीर्द गेली असताना एकदाही वादग्रस्त ठरले नाहीत. 

मोठा कालावधी कार्यभार सांभाळला असल्याने पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चांगला समन्वय झाला होता. त्यामुळे बदली झाली असे समजताच जिल्ह्यातील पोलिस अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांना बदली निमित्त निरोप देण्यासाठी मुख्यालयात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस परेड मैदानावर विशेष कार्यक्रम झाला. यावेळी त्यांची जीप मधून गेडाम यांची सहकुटुंब रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांच्या कुटुंबाची एकत्रित फोटो फ्रेम तयार करून त्यांना भेट देण्यात आली. 

गेडाम यांची कारकीर्द 
- शांत, संयमी स्वभाव 
- लोकसभा, विधानसभा निवडणुका शांततेत 
- जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते सीसीटीव्हीच्या निगराणीखाली 
- पोलिसांसाठी खाजगी संकुल 
- पर्यटकांना तपासणीच्या नावाखाली होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न 
- सीमा नाका वगळता सर्व तपासणी नाके बंदचा धाडसी निर्णय  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farewell to Superintendent of Police Dixit Gedam in sindhudurg