साडेसात एकर जमीन नापीक, भरपाईची प्रतीक्षा, जाणून घ्या नेमक प्रकरण काय?

भूषण आरोसकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

संबंधितांकडून गेल्यावर्षीही अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतात मायनिंगयुक्त गाळ सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - रेडी येथील एका मायनिंग कंपनीतील खनिजयुक्त टाकाऊ माती, चिखल तेथील हुडावाडी व महारतळे वाडीतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत वाहून आल्याने साडेसात एकर जमीन नापीक बनली आहे. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतर महसुलकडून नुकसानीचा पंचनामा झाला असून शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. 

संबंधितांकडून गेल्यावर्षीही अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतात मायनिंगयुक्त गाळ सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत रेडी ग्रामपंचायतीकडून कंपनी व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करून असा प्रकार पुन्हा होऊ नये, याबाबत सूचना दिली होती; मात्र असे असतानाही कंपनीकडून या वर्षीही तसाच प्रकार केल्याने जवळपास हुडावाडी व महारतळे वाडीतील साडेसात एकर जमिनीमधील वीस शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वाचा - कोकणातल्या 'या' चेकपोस्टवर वाहनांच्या लागलेत लांबलचक लांब रांगा....

याबाबत तेथील शेतकरी कृष्णा मराठे व इतरांनी ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्याचे दरवाजे ठोठावले आहेत. झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांसमक्ष पंचनामा होऊन त्यांची भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली; मात्र दीड महिन्यांनी महसूलने याची दखल घेताना चार दिवसांपूर्वी नुकसानीचा पंचनामा केला; मात्र नुकसानी तत्काळ द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांकडून होत आहे. 

हेही वाचा - सिंधुदुर्गातील `वेटलँड` आता एका क्लिकवर! 

प्रशासनाचे लक्ष वेधले 
याबाबत शेतकरी कृष्णा मराठे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. पत्रकात म्हटले आहे, की 18 जूनला रात्री कंपनीकडून खनिजयुक्त माती व गाळ सोडल्याने तो हुडावाडीतील तसेच महारतळे येथील जमिनीत साचला. हा गाळ खनिजयुक्त असल्याने त्या जमिनीत भविष्यात शेती करणे अशक्‍य आहे. कंपनीकडून झालेल्या नुकसानीबाबत तहसीलदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने केला; मात्र आता शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. 

"त्या' मातीचा कंपनीशी संबंध नाही 
शेतकऱ्यांच्या आरोपानंतर संबंधित कंपनीची बाजू जाणून घेण्यात आली. यावेळी संबंधितांनी कंपनीची बाजू मांडली. शेतकऱ्यांनी केलेला आरोप चुकीचा असून शेतात वाहून गेलेली माती कंपनीच्या लीजमधील जमिनीतून वाहून गेलेली ती माती नाही. त्यामुळे त्याच्याशी कंपनीचा कोणताही संबध नसल्याचे संबंधित कंपनी व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farm land bad in redi konkan sindhudurg