चौकुळमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी 

अनिल चव्हाण
Friday, 30 October 2020

गंभीर जखमी झालेल्या नाईक यांना ४५ टाके पडले आहेत.

आंबोली (जि. सिंधुदुर्ग) :  चौकुळ-बेरडकी थोरलामाळ येथे अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात नागेश रिमू नाईक (वय 52) गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. 

याबाबत अधिक माहीती अशी ः बेरडकी येथील नाईक चिखलव्हाळ बेरडकी येथे नाचणी शेतीत गेले होते. तेथे अचानक अस्वल आले आणि त्याने नाईक यांच्यावर हल्ला चढविला. नखांनी ओरबाडून लावून चावा घेतला. त्यांचा आरडाओरड ऐकून गुरे चरण्यासाठी गेलेले आजूबाजूचे शेतकरी तिथे धावले. सर्वांनी हुसकावल्यानंतर अस्वलाने पळ काढला. नाईक यांना तत्काळ 108 रुग्णवाहिकेतून चालक अर्जुन राऊत यांनी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मोहन नाईक, पुंडलिक नाईक, लक्ष्मण नाईक आदींनी त्यांना सहकार्य केले. 

हल्ल्याची माहिती कळल्यानंतर वनपाल वसंत चाळके, अमोल पाटेकर, गोरख भिंगारदिवे, बाळा गावडे, मंगेश नाटेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. याआधीही सात ते आठवेळा तेथील लोकांवर अस्वलाने हल्ला केला आहे. आंबोली नांगरतास परिसरात टस्कर हत्तीने पाठलाग केल्याची घटना ताजी असताना हा एक प्रकार घडल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण आहे. 

हे पण वाचा ः आंबोली गजबजतंय पर्यटकांनी ; अर्थकारणाला मिळतीये गती

 

45 टाके पडले
आंबोली प्राथमिक रुग्णालयात डॉ. महेश जाधव आणि आदिती पाटकर यांनी उपचार केले. त्यांना 45 टाके पडले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले. 
संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer seriously injured in bear attack in Chaukul

फोटो गॅलरी