बागायतदारांना मुंबईत पाठवता येणार हापूस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून आंबा मुंबईकडे रवाना झाला तर त्याची विक्री करण्यासाठी वाशी बाजार समितीत यंत्रणा आवश्‍यक होती. त्यासंदर्भात वाशीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. यावेळी आमदार प्रसाद लाड यांच्यासह पोलिस महानिरीक्षक, बाजार समितीचे आयुक्‍त, पणनचे अधिकारी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

रत्नागिरी - आंबा बागायतदार, व्यावसायिकांना दिलासा मिळाला, असून आंबा वाहतुकीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे गुरुवार दुपारपासून ही वाहतूक सुरू होणार आहे. त्यासाठी आपल्याला तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडून पास 1 आठवड्याकरता दिला जाणार आहे. वाशी (मुंबई) बाजार समितीकडूनही प्रतिदिन दोनशे ट्रक आंबा कोकणातून विकत घेण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये लॉकडाऊन झाले. संचारबंदी लागू झाली आणि दळणवळणाला मर्यादा आल्या. अनेक शंका आणि अडचणींचा सामना करावा लागला. त्याचवेळी आंबा हे फळ तयार होण्याचे हाच कालावधी असताना जिल्हा बंदी झाल्यानंतर तयार आंबा बाहेर कसा पाठवायचा या चिंतेने आंबा उत्पादक, बागायतदार धास्तवले.

यंदाच्या मोसमात आंब्याच्या उत्पन्नाला ग्रहणच लागले. या बागांवर अनेकांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. कोरोनामुळे देशात संचारबंदी लागू झाल्याने या तयार आंब्याचे करायचे काय हा प्रश्न बागायतदारांना पडला होता. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, माजी खासदार नीलेश राणे, आमदार राजन साळवी, माजी आमदार बाळ माने यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी बागायतदारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पावले उचलली होती. त्याला यश आले असून वाहतुकीचा प्रश्न जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोडविला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही वाहतूक होणार आहे. यामुळे आता बागायतदारांची चिंता मिटणार आहे. 

रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून आंबा मुंबईकडे रवाना झाला तर त्याची विक्री करण्यासाठी वाशी बाजार समितीत यंत्रणा आवश्‍यक होती. त्यासंदर्भात वाशीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. यावेळी आमदार प्रसाद लाड यांच्यासह पोलिस महानिरीक्षक, बाजार समितीचे आयुक्‍त, पणनचे अधिकारी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. त्यामध्ये नाशिवंत फळांच्या वाहतुकीला परवानगी देण्याव चर्चा झाली. कोकणातील हापूस मोठ्याप्रमाणात तयार होत आहे. तो वाया जाऊन बागायतदारांचा फटका बसू नये यासाठी वाशीमध्ये हापूस स्विकारण्याची तयारी दर्शविली आहे. प्रतिदिन दोनशे ट्रक वाशीत घेण्याची तयारीही दर्शविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून तसे पास घेऊन ही वाहतूक करण्यात येणार असल्याचे लाड यांनी सांगितले. 

आंबा बागायतदारांना इथे मिळेल परवानगी 

परवानगीचा अर्ज व्हॉट्‌स ऍपवरही करता येणार आहे. त्यांना वाहतुकीसाठी डिजिटल परवानगीही देण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आंबा बागायतदार यांनी आपला गाडी नंबर, कोठून कोठे जाणार, ड्रायव्हरचे नाव, लायसेन्स आदी माहिती अर्जामध्ये भरणे आवश्‍यक आहे. अडचण आल्यास संबंधित जिल्हा अधीक्षक रत्नागिरी अधिकारी जगताप (9420008001), तालुका अधिकारी रत्नागिरी विनोद हेगडे (9405837380), के. व्ही. बापट, रत्नागिरी (9422465828) यांच्याशी संपर्क करा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Can Transport Hapus To Mumbai Ratnagiri Marathi News