शेतकऱ्यांना वर्षभरापासून भरपाईची प्रतीक्षाच 

रुपेश हिराप
Thursday, 1 October 2020

तालुक्‍यातील 13 हजार 163 नुकसानग्रस्तांपैकी 7 हजार 653 शेतकऱ्यांच्याच खात्यावर भरपाईची रक्कम जमा झाली आहे. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - अतिवृष्टीमुळे भातशेती नुकसानीबाबत शेतकरी मागणी करत असताना वर्ष उलटत आल तरी गेल्यावर्षीच्या भातशेती नुकसान भरपाईपासून तालुक्‍यातील अर्धेअधिक शेतकरी वंचित राहिले आहेत. भरपाईसाठी रोज येथील तहसील कार्यालयाची पायरी शेतकरी झिजवत आहेत. तालुक्‍यातील 13 हजार 163 नुकसानग्रस्तांपैकी 7 हजार 653 शेतकऱ्यांच्याच खात्यावर भरपाईची रक्कम जमा झाली आहे. 

जिल्ह्यामध्ये ऑक्‍टोबर, नोव्हेंबर दरम्यान झालेल्या "क्‍यार' वादळात सावंतवाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. भात पिकाचे नुकसान लक्षात घेता शासनाने भरपाई देण्याचे जाहीर केले होते. सुरूवातीला सरसकट भरपाई मिळावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी बांधवांकडून झाली; मात्र शासनाने हेक्‍टरी आठ हजार रुपये भरपाई म्हणून जाहीर केली; मात्र त्यानंतर सामायिक जमिनीचा प्रश्‍न पुढे आला. त्यामध्ये तडजोड करत हमीपत्रावर ही रक्कम देण्याची मागणी शेतकरी तसेच लोकप्रतिनिधी शासन दप्तरी केल्यानंतर याला हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर ही भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याला आवश्‍यक कागदपत्रे गावातील तलाठ्याकडे किंवा तहसीलदार कार्यालयांमध्ये जमा करण्याचे आवाहन तहसीलदार कार्यालयाने केले होते. 

सावंतवाडी तालुक्‍याची स्थिती 
- 13 हजार 163 शेतकऱ्यांचे भरपाईसाठी प्रस्ताव 
- पहिल्या टप्प्यात 88 लाखांचा हप्ता महसूलकडे 
- जवळपास तीन कोटी 36 लाख रुपये टप्प्याटप्प्याने 
- 13 हजार 163 शेतकऱ्यांपैकी 9 हजार 939 पात्र 
- आतापर्यंत 7 हजार 653 शेतकऱ्यांना रक्कम 
- नुकसानग्रस्त रोज झिझवताहेत तहसील कार्यालयाची पायरी 

संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा करण्यात येत आहे. ही प्रक्रिया टप्पाटप्पाने सुरू आहे. काहींची हमीपत्रे नाहीत अशांची गावातील कृषी सहाय्यकामार्फत हमीपत्रे घेण्याचे काम सुरू आहे; मात्र सर्व शेतकऱ्यांची नुकसानी देण्यासाठी अजुन मोठ्या रक्कमेची गरज आहे. 
- राजाराम म्हात्रे, तहसीलदार सावंतवाडी. 

नुकसानीचे 3 कोटी वाटलेले नाहीत. तहसीलदार, कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांमध्ये ताळमेळ नाही. त्यामुळे उर्वरित रक्कम शासनाकडून मिळावी याची अपेक्षा करू नये. हमीपत्रे देऊनही भरपाई मिळाली नाही अशांना तत्काळ रक्कम देण्यासाठी तहसीलदारांनी पुढाकार घ्यावा. 
- रविंद्र मडगावकर, पंचायत समिती सदस्य. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers have been waiting for compensation for a year