शेती पंपासाठी पेट्रोल, डिझेल मिळणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

मुबलक पाणी असूनही शेती बागायती करपल्या होत्या. त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्यावर आता पेट्रोल, डिझेलसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. 

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - अखेर पाण्याअभावी कंठाशी आलेले शेती बागायतीचे प्राण वाचले. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना मोटारपंपासाठी पेट्रोल डिझेल मिळत नव्हते. त्यामुळे मुबलक पाणी असूनही शेती बागायती करपल्या होत्या. त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्यावर आता पेट्रोल, डिझेलसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. 

शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्‍यातील ज्या शेतकऱ्यांना शेती विषयक कामासाठी म्हणजेच डिझेल किंवा पेट्रोल इंजिनने शेती बागायतीला पाणी देणे, ग्रास कटर चालवणे यासाठी पेट्रोल किंवा डिझेलची आवश्‍यकता आहे त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना 10 लिटर पेट्रोल किंवा 20 लिटर डिझेल खरेदीसाठी प्रमाणपत्र देण्यात येईल. यासाठी शेतकऱ्यांने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सातबारा उतारासह अर्ज करणे बंधनकारक राहील. शेतकऱ्यांना 7 दिवसातून एकदाच पेट्रोल डिझेल देण्यात येईल असेही प्रशासनाने म्हटले आहे. 

शासनाचा आग्रह अडचणीचा 

शासनाने वीजवापर कमी करण्यासाठी सौर कृषी पंप घेण्याची सूचना शेतकऱ्यांना केली आहे. अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंपासाठीचे प्रस्ताव पैसे भरूनही पडून आहेत. तर काहींचे पैसे भरून न घेता त्यांना सौर कृषी पंप घेण्याचा आग्रह धरताहेत. त्या भानगडीत शेती बागायती मात्र धोक्‍यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Will Gets Petrol Diesel For Agriculture Pumps