
जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार करावा
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही भविष्यात दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा - देवगड तालुक्यात बहरले पर्यटन
शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात शाळा सुरू झाल्याचा आढावा घेतला असता पालकांकडून कमी प्रतिसाद मिळल्याचे पुढे आले आहे. हरियानामध्ये शेकडो विद्यार्थी कोरोनाबाधित झाले होते. अशी परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासन त्यांची कशी काळजी घेणार, हा प्रश्न आहे. शासनाने जिल्हा प्रशासनावर जबाबदारी दिली आहे. शिक्षकांच्या कोरोना चाचणीत ७ जण बाधित आले आहेत. हे प्रमाण कमी आहे. मुलांना शाळेत पाठवायची मानसिकता नसेल, शिक्षक बाधित आढळत असतील तर जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याची घाई करु नये.
महाराष्ट्रात दुसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनीही शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे सध्या शाळा सुरू करण्याची घाई करू नये. थोडा वेळ घेऊनच हा निर्णय घेतला जावा. प्रशासनाने पुनर्विचार करावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
हेही वाचा - मुख्यालयात मुक्काम भाग पाडू ः आंबोकर
"गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात रत्नागिरीकरांनी संयम ठेवला. दिवाळीत प्रचंड गर्दी झाली; परंतु अजूनही कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आहेत. सध्या तरी लॉकडाउन करण्याचा विचार नाही. नागरिकांनी संयम ठेवला पाहिजे. दिल्ली, अहमदाबादप्रमाणे परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी."
- उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
संपादन - स्नेहल कदम