अफवेमुळे खळबळ, प्रशासनाने खुलासा केल्यामुळे दिलासा

भूषण आरोसकर
Sunday, 30 August 2020

सबनीसवाडा येथे ज्या घरात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, त्या घरातील एका व्यक्तिचे आज निधन झाले; मात्र त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरात आज दिवसभरात एकूण सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. सर्वोदयनगर व बाहेरचावाडा येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे; मात्र सोशल मीडियावर फिरलेला 13 आकडा चुकीचा असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सांगितले. 

सबनीसवाडा येथे ज्या घरात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, त्या घरातील एका व्यक्तिचे आज निधन झाले; मात्र त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. या व्यक्तिचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले असून ते गेली कित्येक दिवस आजारी होते, असेही पालिका प्रशासनाने सांगितले. 

शहरामध्ये आज दिवसभरात एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले; मात्र सोशल मीडियावर शहरात 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची बातमी शहरात फिरल्याने नागरिकांमधून एकप्रकारे भीती व्यक्त करण्यात आली. याबाबत एकमेकांकडे खात्री करण्यासाठी फोनाफोनी सुरु झाली. पालिका प्रशासनाकडून याबाबतची माहिती घेतली असता काही कर्मचाऱ्यांकडून सोशल मिडीयावरीलच आकडा सांगण्यात आला; मात्र तुम्ही खात्री करा, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना विचारले असता, ते म्हणाले, ""शहरात दिवसभरात फक्त सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. इतर सहा रुग्णांचा शहराची कोणताही संबध नाही. जे सात रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी सबनीसवाडा येथील एकाच कुंटूबांतील पाच जणांचा समावेश आहे. सर्वोदय नगर व बाहेरचावाड्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सोशल मिडीयावर फिरणारी बातमी चुकीची आहे; मात्र सात हा आकडा अधिकृत आहे. पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून ज्या-ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या भागामध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. शहरात 45 ठिकाणी कंटेन्मेंट जाहीर केला आहे. आत्तापर्यंत 75 रुग्ण कोरोनाबाधित झाले असून 26 जण बरे होऊन घरी परतले आहेत. दोघांचा मृत्यू झाला असून 47 रुग्ण सद्यस्थितीत सक्रीय आहेत.'' 

विशेष खबरदारी 
सर्वोदय नगरमध्ये आढळलेली "ती' कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍ती येथील एसटी डेपोमध्ये कामाला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांतून भिती व्यक्‍त होत आहे. सबनीसवाडा येथे ज्या कुटुंबातील पाच व्यक्ती करून पॉझिटिव्ह आले आहेत, त्या कुटुंबातील एक व्यक्ती सुरुवातीला बाधित होती. त्यामुळे घरातील सर्वांचे स्वॅब घेतले होते. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यामध्ये पाचही व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या. दरम्यान, तो परिसर कंटेन्मेंट झोन केला असून पालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. 

"ती' मुलगी बाधित 
सावंतवाडी पालिका कर्मचाऱ्याची मुलगी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पालिकेमध्ये काम करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून क्‍वारंटाईन केले आहे. पॉझिटिव्ह आलेली "ती' मुलगी आपल्या पॉझिटिव्ह नातेवाईकांच्या संपर्कात आली होती, असे पालिकेचे नोडल अधिकारी डॉ. उमेश मसुरकर यांनी सांगितले. अन्य काही कर्मचारीही क्‍वारंटाईन असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear in Sawantwadi due to rumors about Corona patients