कोकण : रूपे लागल्यानंतर पालखी बसते सहाणेवरच, निरूळमधील वेगळा शिमगा

festival of shigmo in kokan nerul village celebrating in pawas ratnagiri
festival of shigmo in kokan nerul village celebrating in pawas ratnagiri

पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्‍यातील निरूळमधील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपूर्वी श्री देव सांब देवाची पालखी गावात न फिरवता सहाणेवरच ठेवायचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सध्याच्या कोरोनाच्या निर्बंधाच्या काळात अधिक उपयोगी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. कोणत्याही वादाशिवाय येथील शिमगोत्सव एकोप्याने आणि मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.
पावस परिसरात शिमगोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात व दणक्‍यात साजरा केला जातो. कोरोनामुळे नागरिकांच्या अनेक गोष्टींवर व उत्सवावर बंधने आहेत.

तालुक्‍यातील निरूळ गावातील ग्रामस्थांनी गेली अनेक वर्षे गावामध्ये पालखी फिरवणे आदी गोष्टी सर्वांच्या संमतीने बंद केल्या. गेली अनेक वर्षे गावातील सांब देवाच्या पालखीला रूपे लावल्यानंतर गावातील घरे न घेता सहाणेवरच ठेवली जाते. त्या ठिकाणी गावातील मानकरी, गावकर यांचे मानसन्मान झाल्यानंतर गावातील भगिनी व माहेरवाशिणी त्या ठिकाणी येऊन ओटी भरण्याची पद्धत गेल्या दोनशे वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यामुळे गावामध्ये सामंजस्याने शिमगोत्सव साजरा केला जातो. वादविवादाला वाव दिला जात नाही. त्यामुळेच वर्षानुवर्षे गावात सणासुदीचा एकोपा कायम आहे. काही लोकांनी तसा प्रयत्न केल्यास त्याला वेळीच समज देऊन सणाचे पावित्र्य राखण्याचे आवाहन करतात. त्याला सर्वजण पाठिंबा देतात.

त्यामुळे पावस परिसरातील एकमेव गाव असे आहे की वर्षानुवर्षे गावामध्ये व गावाच्या बाहेर पालखी फिरवण्याची प्रथा बंद आहे. यावर्षी येथील शिमगोत्सव २८ मार्चला होणार आहे. याबाबत संदीप बने म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून मानकरी गावकर व ग्रामस्थांच्या संयुक्त विचाराने देवाची पालखी गावामध्ये न फिरता सहाणेवरच ठेवण्याचा निर्णय झाल्याचे इतिहासात दिसते. आमच्या पूर्वजांना निश्‍चित कळले होते की, काही वर्षांनंतर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या गोष्टींवर परिणाम होणार आहे.’’ 

"श्री सांब देवाचा पालखीत बसवण्यात येणारा मुखवटा सुमारे अठराशे सालातला असल्याचे सांगितले जाते. देवाच्या कृपेने गेली अनेक वर्षे सर्व उत्सव शांततेने व आनंदाने साजरे केले जातात. त्यात प्रामुख्याने एकोपा कायम राखण्यात यश मिळते. शिमगोत्सवात एकमताने कार्यक्रम विनातक्रार केले जातात. पालखी घराघरात फिरत नसल्यामुळे भांडणतंटा उद्‌भवत नाही."

- नीलेश ठीक, पोलिसपाटील आणि गावकार

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com