esakal | कोकणात राडा : दोन कुटुंबांत हाणामारी; सात जण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Fighting two families Seven people injured kankvali crime news

फोंडाघाट बावीचे भाटले येथे पाटकर व कातरुड या दोन कुटुंबात जमिनीचा वाद आहे. हा वाद सध्या न्यायालयात आहे.

कोकणात राडा : दोन कुटुंबांत हाणामारी; सात जण जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) :  फोंडाघाट येथे जमीन वहिवाटीवरून पारकर आणि कातरूड अशा दोन कुटुंबांत झालेल्या हाणामारीत दोन्ही गटांतील सात जण जखमी झाले असून यात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. ही मारहाण काल सायंकाळी चारच्या सुमारास फोंडाघाट बावीचे भाटले येथे कातरूड यांच्या घरात घडली. 

मारहाणीत दांडा डोक्‍यावर मारल्याने दोघे जण गंभीर आहेत. दोघांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. दोघा जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दोघांना कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते; मात्र याबाबत अद्याप पोलिसांत फिर्याद दाखल झालेली नाही. यातील जखमी कातरूड पोलिस ठाण्यात आले होते; मात्र उपचार करून झाल्यावर फिर्याद दाखल केली जाईल, असे पोलिस ठाणे अंमलदार ममता जाधव यांनी त्यांना सांगितले. 

हेही वाचा- ब्रेकिंग : महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

जमीन वादातून फोंडाघाटमध्ये हाणामारी 

फोंडाघाट बावीचे भाटले येथे पाटकर व कातरुड या दोन कुटुंबात जमिनीचा वाद आहे. हा वाद सध्या न्यायालयात आहे. या जमिनीवरून यापूर्वीही वाद झाले होते. या वादातून सायंकाळी कातरुड राहत असलेल्या बावीचे भाटले येथील घरात दोन्ही कुटुंबांतील काही जणांमध्ये वाद झाला. त्यात दोन्ही कुटुंबात लाकडी दांडा व काठ्यांच्या साहाय्याने मारामारी झाली. त्यात सात जण जखमी झाले होते. त्यानंतर परिसरातील लोकांनी धाव घेत वाद मिटवला आणि जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यात गणेश मधुकर पारकर (47), ताराचंद्र मोहन पारकर (49) अनिल पारकर, एकनाथ धोंडू कातरुड, त्यांची पत्नी शुभांगी, मुलगा प्रशांत (सर्व रा. बावीचे भाटले) जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कणकवली पोलिस तपास करीत आहेत. 

संपादन- अर्चना बनगे