फायनान्स कंपन्यांकडून व्याजाच्या दबावाखाली कर्जदारांची होतीये लुट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

दिवाळीच्या सणातही फायनान्स कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. 

चिपळूण (रत्नागिरी) : फायनान्स कंपन्यांच्या पठाणी व्याजाच्या दबावाखाली येथील कर्जदारांची आर्थिक होरपळ होत आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यास कारवाईचा इशारा दिला जातो. अधिकारी, लोकप्रतिनिधी या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. दिवाळीच्या सणातही फायनान्स कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. 

ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अलीकडच्या काळामध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. मर्यादित आर्थिक बळ असणाऱ्या या कंपन्यांना गेल्या दशकात शासनाने व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. यातील बहुतांशी संस्था या दक्षिण भारतातील व्यावसायिकांच्या आहेत. त्यांनी दक्षिण भारतातून हळूहळू महाराष्ट्रात हातपाय पसरले.

हेही वाचा - रत्नागिरीत ८ कोटींच्या प्रस्तावात होणार १३ धरणांची दुरुस्ती -

चिपळूण शहरातही अनेक संस्थांची कार्यालये आहेत. मोबाईल, टीव्ही, फ्रीजपासून इतर अनेक वस्तू घेण्यासाठीसुद्धा या संस्था कर्ज देतात; मात्र एखाद्याला हप्ता भरण्यास उशीर झाला तर कर्जदारामागे तगादा लावतात. फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी सावकारी पद्धतीला लाजवेल, अशा आक्रमक पद्धतीने सक्तीने कर्जाच्या हप्त्यांची वसुली करत आहेत. कंपन्यांच्या दंडेलशाही प्रवृत्तीसमोर कर्जदार हतबल झाले. 

"कोरोनामुळे संसाराची वाताहात झाल्याने कंपनीचे कर्ज भागवायचे कसे? असा प्रश्न पडला. मात्र, फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी हप्ता भरण्यासाठी तगादा लावत आहेत. खेंडमधील एका महिला कर्जदाराला फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने हप्ता वसुलीसाठी फोन केला. महिला कर्जदाराशी प्रतिनिधीने बेताल भाषा वापरली. संबंधित महिलेने कॉल रेकॉर्ड करून ती ध्वनिफिती समाज माध्यमात प्रसारित केली. हे संभाषण ऐकल्यानंतर फायनान्स कंपन्यांची दहशत किती असते, याचा प्रत्यय येत आहे."

- वैशाली देसाई, खेड

"कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी येणाऱ्या प्रतिनिधींची भाषा शिवराळ आणि बेताल असते. याबाबत कर्जदारांनी फायनान्स कंपनीकडे तक्रार केली तर आमचा वसुली विभाग वेगळा आहे. आम्ही कर्ज आणि हप्ते वसुलीचे काम वेगळ्या कंपनीला दिल्याचे सांगितले जाते. खासगी सावकारी पद्धतीनेच कंपन्यांची लूट सुरू आहे."

- इकबाल पठाण, गोवळकोट

हेही वाचा -  सासऱ्याच्या कार्याला जातो म्हणून सांगून गेला ; तीन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finance company exploited buyer from diwali festival also in chiplun ratnagiri