प्रेरणादायी! सोशल मीडियाद्वारे असेही विधायक कार्य, आर्थिक मदतही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

वडील आजारी असल्याने त्यांच्या औषधोपचारासह कुटुंबाचा आर्थिक डोलारा सांभाळण्याची जबाबदारीही सुनीलवर होती. त्याच्या आकस्मिक निधनामुळे चौगुले कुटुंबाला धक्का बसला.

राजापूर (रत्नागिरी) - तालुक्‍यातील "फॅमिली पॉलिटिकल ग्रुप' या सोशल मीडियावरील व्हॉटस्‌ऍप ग्रुपने तालुक्‍यातील आपद्‌ग्रस्त चौगुले कुटुंबाला वीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या ग्रुपने चौगुले कुटुंबीयांना मदत करून सोशल मीडियाच्या माध्यमातून बांधिलकीही जोपासता येते, याचे साऱ्यांसमोर एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. 

तालुक्‍यातील सुनील यशवंत चौगुले महावितरण विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने वायरमन म्हणून कार्यरत होते. सुमारे 32 वर्षीय सुनीलचे विजेच्या धक्‍क्‍याने गत महिन्यात कोतापूर येथे निधन झाले. मनमिळावू स्वभावाचा सुनील चौगुले कुटुंबातील कर्ता होता. वडील आजारी असल्याने त्यांच्या औषधोपचारासह कुटुंबाचा आर्थिक डोलारा सांभाळण्याची जबाबदारीही सुनीलवर होती. त्याच्या आकस्मिक निधनामुळे चौगुले कुटुंबाला धक्का बसला.

या आपद्‌ग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन फॅमिली पॉलिटिकल ग्रुपचे ऍडमिन अरविंद लांजेकर यांनी ग्रुप सदस्यांना केले. त्यांच्या आवाहनाला पंढरीनाथ आंबेरकर, जितेंद्र खामकर, अति नारकर, आबा आडिवरेकर, पिंट्या कोठारकर, राजा पाध्ये, राजन लाड, नासीर काझी, ओंकार प्रभूदेसाई, संतोष चव्हाण, डॉ. सुनील राणे, अविनाश महाजन, सर्फराज काझी, नगरसेविका प्रतीक्षा खडपे आदींनी तातडीने प्रतिसाद दिला. नाटे येथील ऋषिराज फाउंडेशनने चौगुले कुटुंबाकडे सुपूर्द केली. 

सोशल मीडियामधूनही बांधिलकी 
"फॅमिली पॉलिटिकल ग्रुप'ने आदर्शवत सामाजिक बांधिलकी जोपासून सोशल मीडियाही समाजात सकारात्मक बदल आणू शकतो, याचे आदर्शवत उदाहरण साऱ्यांसमोर घालून दिले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial support from the Family Political Group rajapur taluka