अरेरे...! असच सुरू राहिल तर कसा सावरेल बळीराजा?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

आग विझविण्यासाठी रुजाय फर्नांडिस, बस्त्याव फर्नांडिस, मंगल साळगावकर, प्रतीक वालावलकर, उत्तम वालावलकर, विवेक मडुरकर यांनी सहकार्य केले. 

बांदा (सिंधुदुर्ग) - मडुरा रेल्वे स्टेशन परिसरातील मडुरा-पाडलोस सीमा भागात असलेल्या वालावलकर कुटुंबियांच्या एक एकर काजू बागेस आग लागून सुमारे 50 हजारांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी घडली. विवेक मडुरकर यांनी तत्काळ पाण्याची सोय केल्याने ग्रामस्थांनी आग विझविण्यात यश मिळवले. अन्यथा शेकडो एकर काजूबागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असत्या, असे बागायतदार प्रकाश वालावलकर यांनी सांगितले. 

बांदा शिरोडा मार्गावर असलेल्या मडुरा-पाडलोस सीमेवर वालावलकर कुटुंबीयांची मोठी काजू बाग आहे. दुपारच्या सुमारास अचानक धुराचा लोट येत असल्याचे दिसून आले. याची खबर प्रकाश वालावलकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यास सुरूवात केली; परंतु वाढलेले गवत व वारा असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. तत्काळ विवेक मडुरकर यांनी आग विझविण्यासाठी गाडीतून दोन हजार लिटर पाणी आणल्यामुळे ग्रामस्थांनी औषध फवारणीच्या पंपाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझविण्यासाठी रुजाय फर्नांडिस, बस्त्याव फर्नांडिस, मंगल साळगावकर, प्रतीक वालावलकर, उत्तम वालावलकर, विवेक मडुरकर यांनी सहकार्य केले. 

...तर शेतकरी उभा कसा राहणार? 
बागेतील पंधरा वर्षांची जूनी काजूची झाडे जळाल्याने सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अन्य लहानमोठी झाडेही जळाल्याने मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या काजू बियांच्या दराला उतरती कळा लागली असताना असे नुकसान होत असल्यास शेतकरी उभा कसा राहणार, असे सांगत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा वालावलकर यांनी केली. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. उशिरापर्यंत पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire Cashew farm mdura konkan sindhudurg