esakal | तारामुंबरी समुद्रकिनारी मच्छिमाराला सापडलेली देवमाशाची उलटी ;आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यावधीचा भाव
sakal

बोलून बातमी शोधा

तारामुंबरी समुद्रकिनारी मच्छिमाराला सापडली देवमाशाची उलटी

तारामुंबरी समुद्रकिनारी मच्छिमाराला सापडली देवमाशाची उलटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवगड (सिंधुदु्र्ग) : येथील तारामुंबरी (Taramumbari Beach) समुद्रकिनार्‍यावर एका मच्छीमाराला (Fisherman) चिकट पदार्थासारखी वस्तू सापडली आहे. सापडलेला पदार्थ देवमाशाच्या (Whale Vomit)उलटीसदृश असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने सापडलेला पदार्थ ताब्यात घेतला आहे. पदार्थ तपासणीसाठी पुणे येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे तपासणीअंती नेमकेपणाने ही बाब समोर येईल असे वनविभाकडून स्पष्ट करण्यात आले. देवगड तारामुंबरी येथील समुद्रकिनार्‍यावर रविवारी (ता.18) सकाळी स्थानिक मच्छीमार उमाकांत कुबल यांना सुमारे पाच किलो वजनाचा उलटीसदृश पदार्थ आढळला.(fisherman-found-whale-vomit-in-Taramumbari-Beach-sindhudurg-akb84)

प्राथमिक पहाणी करता सापडलेला पदार्थ चिकट स्वरूपाचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यापूर्वी स्थानिक पातळीवर अशा प्रकारचा पदार्थ आढळला नसल्याने त्यांनी त्याची माहिती तात्काळ वनविभागाला दिली. वनविभागाने येथे येऊन पदार्थ ताब्यात घेतला. उलटीसदृश पदार्थाची शहानिशा करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार असून तपासणीअंती त्याची निश्‍चिती होईल अशी माहिती वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांनी दिली. उलटीसदृश सीलबंद केलेला पदार्थ उद्या (ता.20) पुणे येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान स्थानिक मच्छीमार व वनविभागानेही यापुर्वी अशा पध्दतीचा पदार्थ समुद्रकिनारी मिळाला नाही अथवा मिळाल्याची माहिती ऐकीवात नाही. मात्र त्यावेळी सोशल मिडियाचा बोलबाला नसल्यामुळे मच्छिमारांना उलटीबाबतची तेवढी माहिती नव्हती. त्यामुळे जरी अशाप्रकारचा उलटीसदृश पदार्थ निदर्शनास आला असला तरी त्याकडे तेवढ्या महत्वाने लक्ष दिले जात नव्हते असे स्थानिक मच्छिमारांचे म्हणणे होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देवमाशाच्या उलटीला लाखो रूपयांचा भाव असल्याचे मानले जात असून उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी होते अशीही माहिती आहे.

इजिप्तमध्ये याचा प्राचीन काळापासून वापर केला जातो. चीनमध्ये हा पदार्थ ड्रॅगनच्या थुंकीमधून बाहेर येतो असा समज होता. युरोपमध्ये प्लेगच्या साथीमध्ये अ‍ॅम्बरग्रीसचे गोळे जवळ बाळगले तर प्लेगपासून रक्षण होते असे मानले जाई. मध्ययुगात युरोपमध्ये याचा वापर डोकेदुखी, सर्दी, अपस्मार यांच्यावर उपचारासाठी केला जात असे. व्हेल माशाची उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो. त्याला अ‍ॅम्बरग्रीस असं म्हणतात. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकल्यावर वाहत किनार्‍यावर येतो. त्याला पांढुरका पिवळा रंग असतो. या दगडासारख्या गोळ्याला कस्तुरीसारखा गोडसर वास असतो. त्यामुळे त्याचा वापर उच्च प्रतीच्या अत्तराच्या निर्मितीसाठी केला जातो. मात्र आजही उलटी म्हणजे नक्की काय याचा विचार संशोधक करीत आहेत. दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मादागास्कर, मालदीव, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहामा आदी देशांच्या किनार्‍यावर असे सुगंधी गोळे सापडल्याची माहिती आहे

प्रा. नागेश दप्तरदार, वन्यजीव अभ्यासक, देवगड

loading image