त्यावेळी मीच तुमचा मंत्री होतो... शरद पवार यांनी जागविल्या  त्या आठवणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

हवामानातील बदल, अवेळी पडणारा पाऊस आणि एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱ्या पर्ससीननेटच्या मासेमारीमुळे मत्स्यदुष्काळाच्या खाईत लोटल्या गेलेल्या पारंपरिक मच्छीमारांना सावरण्यासाठी सशक्त असा प्रस्ताव सादर करा. तुमच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मालवणातील पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला दिले.

सिंधूदुर्ग : हवामानातील बदल, अवेळी पडणारा पाऊस आणि एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱ्या पर्ससीननेटच्या मासेमारीमुळे मत्स्यदुष्काळाच्या खाईत लोटल्या गेलेल्या पारंपरिक मच्छीमारांना सावरण्यासाठी सशक्त असा प्रस्ताव सादर करा. तुमच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मालवणातील पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला दिले.
 

हे पण वाचा -  टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याची केली बळजबरीने नसबंदी...

विकास अध्ययन केंद्र मुंबई या संस्थेचे संचालक सुरेश शेळके आणि कार्यक्रम समन्वयक रेणुका कड यांच्यासमवेत पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने आज शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. यावेळी मिथून मालंडकर, प्रदीप मोरजे, संजय जामसंडेकर, महेंद्र पराडकर, वसंत गावकर आदी उपस्थित होते. पवार यांना 'मत्स्य दुष्काळ - राष्ट्रीय आपत्ती' ही पुस्तिका भेट देऊन पारंपरिक मच्छीमारांना भेडसावणारा प्रश्न मांडण्यात आला. सागरी मासेमारी अधिसूचनांच्या अंमलबजावणीसाठी मत्स्य विभागासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करावा. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स व एलईडी दिव्यांच्या साह्याने होणारी बेकायदेशीर पर्ससीनची मासेमारी बंद करावी, या प्रमुख मागण्या मच्छीमारांनी केल्या. तब्बल पंधरा ते वीस मिनिटे शरद पवार यांनी आपल्या दालनात मच्छीमार शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी पवार म्हणाले, पारंपरिक मच्छीमारांच्या मागण्यांचा सविस्तर प्रस्ताव सादर करा. मच्छीमारांना सक्षम करण्याच्या दृष्टीने आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ.

हे पण वाचा -  कर्कश हॉर्न वाजवला तर ही होणार शिक्षा... 

त्यावेळी तुमचा मंत्री मीच होतो

मत्स्य दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या राज्यातील सागरी मच्छीमारांना दिलासा देताना २००४ आणि २००८ साली तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मत्स्य पॕकेज दिले होते. याची आठवण मच्छीमारांनी केली असता शरद पवार म्हणाले, तेव्हा केंद्रात मीच तुमचा मंत्री होतो. 

मच्छीमारांवरील गुन्ह्यांबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा

अनधिकृत पर्ससीन नेट मासेमारीविरोधात आंदोलन करणाऱ्या मच्छीमारांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी मच्छीमारांनी केली असता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्ह्यांसंदर्भात सर्व माहिती आपणास सादर करा. आपल्या विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fishermans delegation meets Sharad Pawar