मच्छीमारी नौका देवगडच्या आश्रयाला 

संतोष कुळकर्णी
Thursday, 15 October 2020

गेले चार दिवस किनारपट्टीवरील वातावरण पावसाळी बनले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोराच्या सरी कोसळत आहेत. वीजांच्या प्रचंड लखलखाटासह येथे पाऊस झाला.

देवगड (सिंधुदुर्ग) - समुद्रातील वादळसदृश्‍य स्थिती, पावसाळी वातावरण यामुळे सुरक्षितता म्हणून येथील बंदरात गुजरात येथील 83 मच्छीमारी नौका दाखल झाल्या आहेत. यामुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून बाहेरील आलेल्या नौकांची तपासणी सुरू झाली आहे. 

गेले चार दिवस किनारपट्टीवरील वातावरण पावसाळी बनले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोराच्या सरी कोसळत आहेत. वीजांच्या प्रचंड लखलखाटासह येथे पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणी वीज पडून नुकसान झाले. जामसंडेमधील काही भागातील वीज पुरवठा आज सकाळी पुर्ववत झाला. सोमवारी रात्रीपासून वीज गायब झाली होती. वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जावू नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते.

पावसामुळे स्थानिक मच्छीमारी बंद झाली असताना आता सुरक्षिततेसाठी गुजरात येथील मच्छीमारी नौका येथील बंदरात दाखल झाल्या आहेत. गुजरातमधील सुमारे 83 मच्छीमारी नौका बंदरात आल्या आहेत. त्यावर एकूण 720 मच्छीमार असल्याची माहिती स्थानिक सागरी सुरक्षा यंत्रणेने दिली. गेल्या चोवीस तासात आज सकाळपर्यंत येथे 16 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. गेल्या चार दिवसात येथे सुमारे 201 मिलीमीटर इतका पाऊस झाला. त्यामुळे मच्छीमारांबरोबच भातशेती कापणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण झाली. मच्छीमारी थंडावल्याने स्थानिक बाजारातील मासळीचे प्रमाण घटल्याने भाव वधारला होता. 

धुक्‍याचे साम्राज्य 
एकीकडे जोराचा पाऊस तर दुसरीकडे आज सायंकाळी किनारपट्टीवर दाट धुके पसरले होते. त्यामुळे ऐन पावसातही अनेकांनी दाट धुक्‍याचा आनंद घेतला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fishing boats to the shelter of Devgad