रायगडच्या समुद्रात विषारी जेलिफिशचे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jellyfish
रायगडच्या समुद्रात विषारी जेलिफिशचे संकट

रायगडच्या समुद्रात विषारी जेलिफिशचे संकट

पाली : रायगड जिल्ह्याला तब्बल 240 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. किनारपट्टीवरील बहुतांश लोक मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र आता जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन येथील समुद्रात विषारी जेलिफिशने थैमान घातले आहे. परिणामी कोळी बांधवांना मासेमारीत घातक जेलिफिशची वाढ झाल्याने मासळी मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे माशांचे उत्पादन घटले आहे. आणि मच्छीमारांवर उपासमारीचे सावट आले आहे. मच्छिमारांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, आदगाव, दिवेआगर, भरडखोल, जीवना, दांडा, बागमांडला, तर मुरुड व अलिबाग तालुक्यात नवेदर नवगाव, रेवस, बोडणी, मांडवा, वरसोली अशी मासेमारीसाठी अनेक प्रसिद्ध बंदर आहेत. मात्र या ठिकाणी जेलिफिश मुळे उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याने कोळी बांधव व मत्स्यव्यवसाईक चिंताग्रस्त झालेत. त्यातच सध्या खोल समुद्रात जेलिफिश वाढल्याने जाळ्यात जेलिफिशचे प्रमाण जास्त असल्याने मासळी फार कमी मिळत आहे. खर्च देखील सुटत नसल्याची परिस्थिती आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील कल्पेश पावशे या मच्छिमारांनी सांगितले की कोरोनाने ग्रामीण भागातील अनेकांचे व्यवसाय हिरावले. पर्यटनावर अवलंबून असणार्‍या मासेमारी व्यवसायासोबत अनेक व्यवसाय बंद होते. मात्र आता श्रीवर्धनमधील पर्यटन हंगामाला जोर मिळत असताना मासेमारी व्यवसाय जेलिफिशमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. भरडखोल येथील सरपंच दिनेश चोगले यांनी सांगितले की भरडखोल बंदरात गेली काही दिवस मच्छी साठी टाकलेली जाळी व डोलवी जेलिफिशने भरून निघते. त्यामुळे जाळ्यात मासळी कमी प्रमाणात असते व जेलिफिश जास्त असते. यामुळे आमचे मोठया प्रमाणात नुकसान होते. दिघी कोळी समाज अध्यक्ष किरण कांदेकर यांनी सांगितले की सध्या कोळी बांधवांच्या पदरात फायद्यापेक्षा खोट पडत आहे. मासेमारी नौका किनाऱ्यालाच उभ्या असल्याने नोकरांचे पगार, डिझेल, भत्ता खर्च, जाळीखर्च व कर्जाचे थकलेले हप्ते कसे भरायचे असा प्रश्न पडला आहे. जेलिफिश सारखी नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत. त्याकरिता शासनाने आम्हा कोळी बांधवांना मदत मिळावी.

मोठी मासळी गावत नाय

नवेदर नवगांव कोळी वाड्यातील शिवदास गजानन मुंडे यांनी सांगितले की जेलफिशमुळे तीन महीने बोटी किनारी लागून आहेत. आमची संपूर्ण जाळी फाटली. यापूर्वीच वादळांनी आमचे खुप मोठे नुकसान झाले. तर आता जेलीफिशमुळे आमची अवस्था बिकट झाली आहे. जेलिफिशमुळे मोठी मच्छी नष्ट झाली. सरगा, शिंगाडा, पापलेट, घोळ आदी मोठे मासे आता मिळत नाही. लहान मच्छी परवडत नाही, कामगारांची मंजूरी सूटत नाही. कोळी बांधव संकटात आहेत. सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे.

सरकारचे दुर्लक्ष

विमल अमृत कोळी या कोळी महिलेने डोळ्यांच्या कडा ओल्या करत म्हणाली की जेलीफिशमुळे आमचे धंदे ठप्प पडलेत. वर्षभर हातात कोणतेही उत्पन्न नाही. जेलिफिश मुळे हाता पायांना खाज येते. डोळ्यांना इजा होते. उन्हात फिट येवून कोळनी पडतात. सरकारचे दुर्लक्ष आहे. जेट्टीवर कोणत्याही सोईसुविधा नाहीत. निवडणुकीत राजकारणी केवळ आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात कोळी बांधवांच्या वेदना व कष्ट कमी व्हायला कोणतीही मदत व सहकार्य करत नाहीत. आमची कुटुंब आम्ही जगवायची कशी? असा सवाल विमल कोळी यांनी उपस्थीत केला.

एलईडी मुळे वाढ

नवेदर नवगाव कोळी वाड्यातील दिनेश पोशा सुरेकर म्हणाले की पाच वर्षापासून जेलीफिश मुळे आमचे मासळी उत्पादन घटलेय. एलईडी बोटीमुळे जेलीफिश वाढले आहेत. त्यांच्या प्रकाश झोताने जेलीफिश खोल समुद्रात जात नसून किनाऱ्याकडे येते. जाळ्यात जेलीफिश मोठ्या प्रमाणावर सापडत असून मत्स्य उत्पादनाला फटका बसला आहे. सरकार कडून कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. सरकार कडून नुकसान भरपाई मिळावी हीच मागणी आहे. दिपक झिटे यांनी सांगितले की एलईडी बोटींमुळे जेलीफिश वाढत आहेत. सरकार या बोटींवर कारवाई करत नाही. त्यामुळे पारंपरिक व छोटे व्यवसाईक मरत आहेत. एलईडी बोटी बंद झाल्या पाहिजे.

बोटी लवकरच किनारी

शासनातर्फे जूनपासून मासेमारी न करण्याचे आदेश दिले गेलेत. त्यानुसार २८ मे पासून मच्छिमार होड्या किनाऱ्याला लावत असतात. परंतु यंदा जेलिफिशचा फटका बसून मासळीच मिळत नसल्याने मच्छिमारांनी स्वतःहून लवकरच आपल्या होड्या किनाऱ्यावर साकारून पुन्हा मासेमारीला न जाण्याचे ठरवल्यामुळे एकदरा पुलाच्या कठड्याला जाळ्या सुकवण्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदा किमान एक महिना अगोदर मासेमारीचा काळ समाप्त झाला असून खूप लवकर मासेमारी संपुष्टात आली आहे. मासळी नसल्यामुळे होड्या किनारी आल्याने कोळी बांधवांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

जेलीफिश अत्यंत घातक व विषारी आहे. जेलिफिशने शारीरिक व आर्थिक हानी होत आहे. आम्ही वारंवार सरकारकडे निवेदनाद्वारे यासंदर्भात प्रश्न व समस्या मांडतोय, मात्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद व सहकार्य मिळत नाही, हे दुर्दैव्य आहे. डिझेल भाव वाढीने व जेलिफिशने मत्स्य उत्पादन घटल्याने मच्छीमार कोळी बांधवांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. एलईडी बोटींच्या प्रकाश झोताने जेलिफिश खोल समुद्रात न जाता किनारपट्टी कडे येते. परिणामी पारंपरिक व लहान होड्याने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासे कमी व जेलिफिश अधिक येतात, यामुळे जाळी तुटून देखील नुकसान होते. सरकारने याचा साकल्याने विचार करून कोळी बांधवांना जगविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे.

- उल्हास वाटखरे, चेअरमन, महादेव मच्छीमार संघटना

समुद्रकिनारी जेलिफिशना पोषक वातावरण तयार होऊन त्या किनार्‍यालगत मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. जेलिफिशचा डंक शरीराला इलेक्ट्रिक शॉक लागल्या सारखा असतो. त्यामुळे वेदना होऊन सर्वत्र खाज सुटते. मासेमारीत डोलवी मध्ये माशांऐवजी मोठया प्रमाणात जेलिफिश अडकल्याने उत्पादन घटले आहे. तसेच ती शरीराला घातक ठरत आहे. हातापायांना, डोळ्यांना इजा होण्याची भीती मासेमारीला जातांना मनात कायम आहे.

-बाळकृष्ण रघुवीर, जीवना कोळीवाडा, माजी चेअरमन

मागील काही वर्षात जेलीफिश चे प्रमाण रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या सागरी कोकण किनार पट्टित वाढल्याचे दिसत आहे. जेलीफिश च्या उपद्रवाने मत्स्य उत्पादन घटते आहे. सागरात येणारी वादळ, वातावरणातील बदल, अन्नसाखळी मधील बदल झाल्यानंतर जेलिफिशला खाद्य पदार्थांची विपुलता किनारपट्टीवर अधिक आढळण्याची शक्यता असते. सागरातील जीवाणु हे खाद्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे एखाद्या जिवाणुची संख्या कमी अथवा जास्त होताना दिसते. सध्या जेलिफिश चे प्रमाण वाढल्याचे दिसते आहे.

- सुरेश भारती, सहाय्यक मत्स्य आयुक्त अलिबाग, रायगड

Web Title: Fishing Business Crisis Of Poisonous Jellyfish In Sea Of Raigad Pali

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top