कोकण रेल्वे मार्गावर पाच नवी स्थानके 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीवर मात करत कोकण रेल्वे धावली. या मार्गावरील वाहतूक वाढविण्यासाठी गेली पाच वर्षे दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. मुंबईहून गोवा तसेच पश्‍चिम व तळ कोकणात जाण्यासाठी हा उपयुक्त व महत्वाचा मार्ग आहे.

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास गतिमान करण्यासाठी दुपदरीकरणासह विद्युतीकरण वेगाने सुरू आहे. दोन स्थानकांमधील अंतर कमी करण्यासाठी पाच नवीन क्रॉसिंग स्थानके उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामधील रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील वेरवली या क्रॉसिंग स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीवर मात करत कोकण रेल्वे धावली. या मार्गावरील वाहतूक वाढविण्यासाठी गेली पाच वर्षे दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. मुंबईहून गोवा तसेच पश्‍चिम व तळ कोकणात जाण्यासाठी हा उपयुक्त व महत्वाचा मार्ग आहे.

कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित व अधिक जलद व्हावा यासाठी पाच नवीन क्रॉसिंग रेल्वे स्थानके उभारण्याचे काम सुरू आहे. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि जलदगतीने व्हावा यासाठी भरीव निधी दिला होता. त्यामधून ही नवीन क्रॉसिंग स्थानके उभारली जात आहेत. त्यापैकी तीन स्थानके रायगड जिल्ह्यातील आहेत. 

कोलाड आणि माणगांवमध्ये इंदापूर रोड हे स्थानकाचे काम सुरू आहे. वीर-करंजाडी या दोन स्थानकांमध्ये सापे हे इंदापूर स्टेशनपासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावरील स्थानक आहे. वामने येथेही क्रॉसिंग स्थानक सुरू करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात वेरवली स्थानकाचे काम प्रगतीपथावर असून क्रॉसिंगसाठी उपयुक्‍त ठरेल. या स्थानकांमध्ये प्रतिक्षागृह, आरक्षण व्यवस्थाही केली जाणार आहे. पर्यटनासाठी अधिकाधिक रेल्वे सुरक्षा देण्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, विद्युतीकरण व 11 नवीन स्थानकाच्या बांधकामाचा निर्णय रेल्वे मंत्रिपदाच्या कारकिर्दीत सुरेश प्रभु यांनी घेतला होता तसेच काही स्थानके दर्जेदार बनविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यानुसार ही कामे सुरू आहेत. 

अर्थकारणाला येणार गती 
दुपदरीकरणाबरोबरच विद्युतीकरणाचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोकण रेल्वेमार्गावरील ही कामे पूर्ण झाल्यास कोकण रेल्वेचा प्रवास गतिमान होईल. यामुळे कोकण रेल्वेकडील लोकांचा कल अधिकाधिक वाढेल. देश-विदेशातील पर्यटक कोकण दर्शनासह गोव्याकडे जाण्यासाठी कोकण रेल्वेचा उपयोग करतील. यामधून अर्थकारणालाही चालना मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five New Stations On Konkan Railway Line