कोरोना : सिंधुदुर्गात  रात्रीत वाढले पाच रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

गेले दोन दिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने झोप उडालेल्या सिंधुदुर्ग प्रशासन आणि नागरिकांना शनिवारी सांयकाळपर्यंत मिळालेला दिलास अल्पकाळ ठरला.

ओरोस : गेले दोन दिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने झोप उडालेल्या सिंधुदुर्ग प्रशासन आणि नागरिकांना शनिवारी सांयकाळपर्यंत मिळालेला दिलास अल्पकाळ ठरला. कारण रात्री उशिरा आलेल्या अहवालांमध्ये पाच पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.  गुरुवार व शुक्रवारी तब्बल 31 रुग्ण आढळले होते. आज सायंकाळी उशिरापर्यंत एकही नवीन रुग्ण मिळालेला नाही; मात्र रात्री पाचजण बाधित आढळले. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 53 झाली आहे. दरम्यान, अजून 290 कोरोना तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींचा ओघ तसाच सुरू असून महिन्याभरात दाखल व्यक्तींची संख्या 55 हजारांवर पोहोचली आहे. ही बाब प्रशासनासाठी चिंतेची ठरत आहे. आजअखेर सात रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 29 मे रोजी प्राप्त अहवालांमध्ये एकूण 18 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये वैभववाडी तालुक्‍यातील दोन, कणकवली तालुक्‍यातील 12, सावंतवाडी तालुक्‍यातील तीन आणि मालवण तालुक्‍यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. काल रात्री उशिरा नऊ अहवाल आले होते. हे पॉझिटिव्ह रुग्ण कणकवली तालुक्‍यातील आहेत. त्यामध्ये वारगाव येथील पाच, उंबर्डे बिडवाडी दोन, कासार्डे धुमाळवाडी आणि सडुरे तांबळघाटीत प्रत्येकी एक आहे. 

जिल्ह्याची स्थिती 

 • एकूण संस्थात्मक क्वारंटाइन - 26 हजार 378 
 • शासकीय संस्थात क्वारंटाइन- 382 
 • गावपातळीवरील कक्षात - 24 हजार 851 
 • नागरी क्षेत्रामध्ये - 1 हजार 45 
 • तपासणीसाठी पाठविलेले नमुने - 1 हजार 710 
 • पैकी निगेटिव्ह - 1 हजार 372 
 • प्रतीक्षेत असलेले अहवाल - 290 
 • आयसोलेशन कक्षात दाखल - 135 
 • पैकी डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये- 81, 
 • डेडिकेटेड कोविड हेल्थ केअरमध्ये -30 
 • कोविड केअर सेंटरमध्ये - 24 
 • दिवसभरात तपासलेल्या व्यक्ती - 6 हजार 647 
 • एकूण जिल्ह्यात आलेले - 55 हजार 21 

जिल्ह्यात दहा कंटेन्मेंट झोन 
जिल्ह्यात कणकवली तालुक्‍यातील शिवडाव, डामरे, वैभववाडी तालुक्‍यातील मौजे तिरवडे तफ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुब नगर, ब्राह्मणदेववाडी, आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्‍यातील कारिवडे, माडखोल, कुडाळ तालुक्‍यातील पणदूर - मयेकरवाडी, मालवण तालुक्‍यातील हिवाळे असे कंटेन्मेंट झोन आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five patients increased in Sindhudurg last night